गुजरातमध्ये गोहत्याबंदी कायदा अधिक कठोर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

याच कायद्यामध्ये 2011 मध्येही दुरुस्ती करण्यात आली होती. याआधी गोहत्या केल्यास केवळ सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होत असे. या कायद्यान्वये ठोठावल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली असून, ती 5 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे

अहमदाबाद - गुजरात सरकारने गोहत्याबंदी कायदा अधिक कठोर केला असून गायींची हत्या आता अजामीनपात्र गुन्हा समजला जाणार असून, तसे कृत्य करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाईल. गोमांस बाळगणे अथवा त्याची वाहतूक करणाऱ्यासही दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो, तसेच दोषींना पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल. राज्य विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी आज "गो संरक्षण दुरुस्ती' विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

"गुजरात प्राणी संरक्षण कायदा- 1954' अन्वये आता गायींची कत्तलीसाठी वाहतूक करणेदेखील गुन्हा समजला जाणार असून, त्यासाठी दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. याच कायद्यामध्ये 2011 मध्येही दुरुस्ती करण्यात आली होती. याआधी गोहत्या केल्यास केवळ सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होत असे. या कायद्यान्वये ठोठावल्या जाणाऱ्या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली असून, ती 5 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर गुजरातमधील गोहत्याबंदी कायदा कठोर करण्यामागे भाजप श्रेष्ठींची निश्‍चित रणनीती असल्याचे बोलले जाते. "यूपी'चे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोहत्याबंदी कायद्याचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी गाय, गंगा आणि गीता यांच्या संरक्षणासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे वक्तव्य केले होते.

Web Title: Gujarat to have more stringent cow slaughter law