
Gujarat High Court : कोंबडी आधी की अंडं हाच प्रश्न सुटेना; आता नव्या प्रश्नाने चिकन दुकानं पडली बंद
आधी कोंबडी की अंडं? हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून सुटलेला नाही. पण कोंबडा हा प्राणी आहे का हा नवा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रश्नावर बुधवारी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी झाली.
याचिकेत कत्तलखान्यांऐवजी चिकन शॉपवर कोंबड्या मारण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.यामुळे चिकनची दुकानंही बंद करण्यात आली आहेत. आता पोल्ट्री व्यापारी आणि चिकन शॉप मालकांना आशा आहे की हायकोर्ट त्यांच्या याचिकांवर सुनावणी करेल आणि त्यांना लवकरच त्यांची दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी देईल.
गुजरात उच्च न्यायालय अॅनिमल वेल्फेअर फाऊंडेशन आणि अहिंसा महासंघाच्या याचिकांवर सुनावणी करत गुजरात उच्च न्यायालयाने नुकतीच दुकानांमध्ये कोंबडीच्या कत्तलीवर बंदी घातली होती. स्वच्छतेची काळजी घ्यावी, असंही न्यायालयानं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुजरातमधील मोठ्या शहरातील महानगरपालिकांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात मांसाची दुकाने बंद केली होती. सुरत महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक दुकानं उभारण्यात आली आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पोल्ट्री व्यापारी आणि चिकन शॉप मालकांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पहिल्या सुनावणीदरम्यान कोंबडी पक्षी की प्राणी असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं. कत्तलखान्यात पक्ष्यांची कत्तल करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे, तर पोल्ट्री व्यापारी आणि चिकन दुकान मालकांनी ही मागणी व्यावहारिक नसल्याचा युक्तिवाद केला आहे.
कत्तलखाने हे जनावरांच्या कत्तलीसाठी असतात, असा त्यांचा युक्तिवाद आहे. अशा परिस्थितीत कुक्कुट वर्गातल्या पक्ष्यांना प्राण्यांच्या कक्षेत आणायला हवं, असाही युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.