गुजरात अमूल्य, कधीच खरेदी करू शकत नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

गुजरात अमूल्य आहे. गुजरातला कधीच खरेदी करू शकत नाही आणि गुजरात कधीच विकला जाऊ शकत नाही.

नवी दिल्ली - पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांना भाजपने एक कोटी रुपयांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात हा अमूल्य प्रदेश असून, गुजरातला कधीच खरेदी करू शकत नाही, असे म्हटले आहे.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाटीदार समाज हा गुजरात निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारा घटक आहे. हार्दिक पटेल हा या समाजाचा सर्वात लोकप्रिय नेता आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी दहा लाख रुपये दाखवत भाजपकडून एक कोटी रुपयांना खरेदी करण्याचा आल्याचा आरोप केला आहे. तर, निखिल सावगी या पाटीदार नेत्यानेही भाजपला रामराम केला आहे.

या सर्व मुद्द्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की गुजरात अमूल्य आहे. गुजरातला कधीच खरेदी करू शकत नाही आणि गुजरात कधीच विकला जाऊ शकत नाही. दरम्यान आज (सोमवार) राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असून, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत. तर, हार्दिक पटेल यांनाही काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे. 

गुजरातमधील जनता एवढी स्वस्त नाही- हार्दिक
गुजरातमधील जनता एवढीपण स्वस्त नाही, की भाजप त्यांना खरेदी करू शकेल. भाजपकडून गुजरातमधील जनतेचा अपमान केला जात आहे. जनता नक्कीच या अपमानाचा बदला घेईल, असे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Gujarat is priceless, can never be bought: Rahul Gandhi on Narendra Patel’s bribery claims