गांधींजींनी आत्महत्या कशी केली? परीक्षेत धक्कादायक प्रश्‍न 

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

महात्मा गांधीजींनी आत्महत्या कशी केली? हा प्रश्‍न वाचून आपल्याला धक्का बसेल. मात्र, गुजरातच्या एका शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांना शनिवारच्या परीक्षेत हा प्रश्‍न विचारल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

गांधीनगर : महात्मा गांधीजींनी आत्महत्या कशी केली? हा प्रश्‍न वाचून आपल्याला धक्का बसेल. मात्र, गुजरातच्या एका शाळेत नववीच्या विद्यार्थ्यांना शनिवारच्या परीक्षेत हा प्रश्‍न विचारल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

गांधीनगर जिल्ह्यातील माणसा येथे सुफलाम स्कूल विकास संकुलतर्फे नववीच्या विद्यार्थ्यांना गुजराथी विषयात गांधीजीं विषयी आक्षेपार्ह प्रश्‍न विचारण्यात आला. त्यासाठी चार गुण देण्यात आले होते. याशिवाय आणखी एका प्रश्‍नाने राज्यात वाद सुरू झाला आहे. याच शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या भागातील दारूविक्री आणि दारुड्यांचा त्रास वाढला असून, त्याची तक्रार करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना पत्र लिहा, असा प्रश्‍न विचारला. यासाठी पाच गुण देण्यात आले होते. अर्थात, गुजरातमध्ये दारूबंदी असून, अशा प्रकारच्या प्रश्‍नाला अर्थच राहत नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे गांधीजी आणि मद्यपान यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नांनी गुजरातेत वाद निर्माण झाला आहे.

गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी म्हटले, की ही प्रश्‍नपत्रिका गुजरात शिक्षण मंडळाची नाही. खासगी शिक्षण संस्थेकडून पेपर तयार करण्यात आला आहे. अर्थात अशा प्रकारचे प्रश्‍न विचारणे चुकीचे आहे. अशा प्रश्‍नांमुळे मुलांत ज्ञानवृद्धी होण्याऐवजी संभ्रम निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी चौकशी केली जाणार असून, त्यानंतर कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat school exam shocker How did Mahatma Gandhi commit suicide?