55 व्यापारी संघटनांचा चिनी मालावर बहिष्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवादी घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातला तसेच अण्वस्त्र पुरवठा गटातही (एनएसजी) भारताच्या प्रवेशाचा मार्ग चीनने रोखला या निषेधार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला

अहमदाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी गुजरात चेंबरच्या वाणिज्य आणि उद्योग संघाने (जीसीसीआय) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमधील सुमारे 70 ते 75 व्यापारी संघटनांना आज बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. यातील उपस्थित सर्व 55 जणांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्यास संमती दर्शविली. 
 

जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांकडून दहशतवादी घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खोडा घातला तसेच अण्वस्त्र पुरवठा गटातही (एनएसजी) भारताच्या प्रवेशाचा मार्ग चीनने रोखला या निषेधार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला होता. जीसीसीआयने आज बैठक घेऊन भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा केली. यापुढे चिनी वस्तूंची आयात बंद करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जीसीसीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष शैलेश पतवारी यांनी दिली. 
 

या बैठकीला वडोदरा आणि राजकोटच्या वाणिज्य आणि व्यापार चेंबर्स संघटनेचे प्रतिनिधी, कपडे व्यापारी संघटना आणि नवे कपडा मार्केट आदी संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते. या वेळी फटाके, शोभेच्या माळा, खेळणी, संगणक, मातीची भांडी, पतंग आणि मांजे यासारख्या अनेक उत्पादनांची आयात बंद करून स्वदेशी वस्तू विकण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. याला अनेक व्यापाऱ्यांनी संमतीही दर्शविल्याची माहिती जीसीसीआयचे अध्यक्ष बिपिन पटेल यांनी दिली. 

गुजरातमधील व्यापाराचा विचार करता येथून दरवर्षी सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा माल चीनहून आयात केला जात होता, यामध्ये रसायने, औषधे, कपडे निर्मितीतील यंत्रसामग्री आदींचा समावेश होता. जीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी चीनहून भारतात सुमारे 61 अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीचा माल आयात केला जातो, तर भारतातून चीनला केवळ 9 अब्ज डॉलर्स एवढ्याच किमतीच्या मालाची निर्यात होते. 

Web Title: gujarat traders boycott china