शंकरसिंह वाघेला यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट

गांधीनगर: गुजरातमधील ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी आज काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाघेला यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याने हा निर्णय घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचा त्याग केला असला तरी भाजपसह इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे वाघेला यांनी स्पष्ट केले आहे.

वाघेला यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी काढलेल्या रॅलीदरम्यान त्यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. माझी काँग्रेसमधून 24 तासांपूर्वीच हकालपट्टी झाल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. दोन दशकांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गुजरात विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा तातडीने राजीनामा देणार असून, राज्यातील राज्यसभा जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे वाघेला यांनी आज जाहीर केले. वाघेला यांनी त्यांचे आगामी राजकीय धोरण स्पष्ट केलेले नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी गुजरातमधील काँग्रेस आमदारांची मते फुटल्याच्या घटनेचाही वाघेला यांच्या राजीनाम्याला संदर्भ आहे. गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार असताना काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांना 49 मतेच पडली.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री असलेले शंकरसिंह वाघेला यांचे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी पटत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रसिद्धी द्यावी, या त्यांच्या मागणीला दिल्लीतून नकार मिळाला होता. वाघेला यांच्या आजच्या निर्णयाचा फटका काँग्रेसला पुढील महिन्यात होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही बसण्याची शक्‍यता आहे. वाघेला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगत असले तरी ते नवा पक्ष स्थापन करण्याचा अंदाज काही विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: gujrath news shankarsingh vaghela exit from Congress