गुरुदासपूरमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला झटका

वृत्तसंस्था
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनीही काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंजाबने दिलेले ही दिवाळी भेट आहे. अकाली दल आणि भाजपला या निकालातून सणसणीत चपराक बसली आहे.

गुरुदासपूर - पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी तब्बल 1,93,219 मतांनी विजय मिळवला असून, भाजपला मोठा झटका बसला आहे.

विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली होती. भाजपने लोकसभेची ही जागा टिकवण्यासाठी स्वरण सलारिया यांना उमेदवारी दिली होती. तर, काँग्रेसने सुनील जाखड यांना आणि आम आदमी पक्षाने (आप) निवृत्त मेजर जनरल सुरेश खजुरिया यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत काँग्रेसने दीड लाखांहून अधिक फरकाने विजय मिळविला आहे. तर, आपच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

काँग्रेसने पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत सत्ता स्थापन केली होती. आता लोकसभा पोटनिवडणुकीत मिळविलेल्या विजयामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपला आपली जागा टिकवण्यात अपयश आल्याने मोठा झटका बसला आहे. 

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनीही काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंजाबने दिलेले ही दिवाळी भेट आहे. अकाली दल आणि भाजपला या निकालातून सणसणीत चपराक बसली आहे. हा नरेंद्र मोदी सरकारला इशारा असल्याचे वक्तव्य सुनील जाखड यांनी केला आहे.

Web Title: Gurdaspur By-Election Results Congress Candidate Sunil Jakhar wins