परीक्षा रद्द व्हावी म्हणून अन्य विद्यार्थ्याकडून प्रद्युम्नची हत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

गुडगावमधील "रायन इंटरनॅशनल विद्यालया'त प्रद्युम्नची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर शाळेच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली होती. सीबीआयच्या तपासादरम्यान अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय इतर अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत

गुडगाव - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षीय बालकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यास केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) अखेर यश आले आहे. अकरावीत शिकणाऱ्या अन्य एका विद्यार्थ्याने त्याची परीक्षा आणि शाळेची पालकसभा रद्द व्हावी, यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीबीआयच्या या तपासामुळे या प्रकरणास धक्कादायक वळण मिळाले आहे. याआधी प्रद्युम्नचा खून हा "बस वाहका'ने केल्याचे मानले जात होते. मात्र सीबीआयच्या नवीन तपासामुळे या प्रकरणाची एकंदर दिशाच बदलून गेली आहे.

गुडगावमधील "रायन इंटरनॅशनल विद्यालया'त प्रद्युम्नची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर शाळेच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली होती. सीबीआयच्या तपासादरम्यान अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय इतर अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.

या विद्यार्थी आरोपीला या हत्येबाबत याआधी विचारण्यात आले होते. मात्र, अनेकदा तो आपले जबाब बदलत असे. या विद्यार्थ्यासच प्रथम प्रद्युम्न याचा मृतदेह दिसल्याचे आढळून आले होते. या विद्यार्थ्याची गेल्या वर्षभरापासून "मानसिक तपासणी' सुरु असल्याचेही तपासांती स्पष्ट झाले आहे. प्रद्युम्नचा खून होण्याच्या काही दिवस आधीच या आरोपी विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांशी बोलताना "शाळेतील परीक्षा पुढे ढकलली जाणार असल्याने अभ्यास करावयाची गरज नाही,' असे विधान केले होते. शाळेमधील स्वच्छतागृहात प्रद्युम्नचा खून करण्यासाठी वापरण्यात आल्याची शक्‍यता असलेले शस्त्रही सीबीआयला आढळले आहे.

या विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्यांच्या मुलाने खून केला नसल्याचा दावा यावेळी केला. "आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. माझ्या मुलाची चारवेळेस चौकशी करण्यात आली. तसेच काल मध्यरात्रीपर्यंत त्यांनी मला बसवून ठेवले होते. तुमच्या मुलाने खून केल्याने त्याला अटक करण्यात येत असून तुम्ही त्याच्या कबुलीजबाबावर स्वाक्षरी करावी, असे मला सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मला रात्री 2 वाजता सोडले. आरोप कबूल करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकण्यात आला,'' असे या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.

Web Title: Gurgaon Schoolboy Killed By Senior

टॅग्स