'खूप झाले'... जवानाच्या मुलीने थांबवले ABVPविरोधी आंदोलन

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

गुरमेहेर हिने ट्विटरवरून आपला निर्णय जाहीर केला आहे. 

नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधातील (ABVP) आपली मोहीम थांबवत असल्याचे दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहेर कौर हिने आज (मंगळवार) जाहीर केले आहे. 

"ही मोहीम माझ्यासाठी नव्हे, तर माझ्या सहकारी विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र, मला खूप वाईट अनुभव आला. माझ्यासारखी 20 वर्षांची मुलगी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही," असे तिने म्हटले आहे. 

विद्यार्थ्यांनी AISA आणि NSUIच्या वतीने आयोजित आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही गुरमेहेरने केले आहे. 
"एक नक्की करा की पुढच्या वेळी हिंसाचार किंवा धमक्यांचा मार्ग अवलंबण्यापूर्वी दोनदा विचार करा. यासाठीच हे सर्व होते... माझे धैर्य आणि शौर्य याबद्दल जे प्रश्न विचारत आहेत त्यांना पुरेसे प्रत्युत्तर दिले आहे," असेही तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सोशल मीडियावर अभाविपच्या विरोधात गुरमेहेरने मोहीम उघडत त्यांच्या भूमिकेला प्रखर विरोध केला. हा विषय सोशल मीडियासह माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चत आला. सोशल मीडियावर #StudentsagainstABVP हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला.

गुरमेहरच्या पोस्टला मोठा प्रतिसाद
साहित्याचा अभ्यास करणाऱ्या गुरमेहरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी व समवयस्कांनी तिची पोस्ट शेअर केली असून, विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी त्यांची फेसबुकवरील छायाचित्रे गुरमेहरच्या छायाचित्रांप्रमाणे करण्याचे आवाहन केले आहे. तिच्या पोस्टवर दोन हजार 100 प्रतिक्रिया आल्या असून, तीन हजार 456 जणांनी ती शेअर केली आहे, तर 543 कमेंट्‌स आल्या आहेत.

"गुरमेहर ही राजकीय प्यादे' 
गुरमेहर कौर हिने "अभाविप'विरोधात सोशल मीडियावर सुरू केलेल्या चळवळीचा युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व अभिनेता रणदीप हुडा यांनी तिचा उल्लेख "राजकीय प्यादे' असा केला आहे. त्याच्या ट्विटला गुरमेहरने उत्तर दिले असून, त्यांच्यातील ट्विटरयुद्ध आज चांगलेच भडकले होते. "मी त्रिशतक केले नाही. माझ्या बॅटने ते केले,' असा मजकूर लिहिलेला फलक घेतलेले छायाचित्र सेहवागने आज ट्विटरवर पोस्ट केले आहे. मात्र, सेहवागने युद्धाची तुलना क्रिकेट सामन्याशी केल्याने त्याच्या ट्विटवर अनेकांनी टीकेची झोड उठविली. रणदीप हुडाने मात्र त्याची पाठराखण करीत "गुरमेहरला राजकीय प्यादे बनविले आहे,' असे ट्‌विट केले आहे. त्याच्यावरही ट्‌विटरवर टीका करण्यात आली आहे. 

हुडाच्या ट्‌विटला गुरमेहरने उत्तर दिले आहे. "माझ्याविषयी द्वेष पसरविण्यास मदत केल्याने मी आभारी आहे. तुमच्या "प्यादे'या शब्दामुळे मला आनंद झाला. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराला मी पाठिंबा दिला नाही, ही माझी चूक आहे का? असा सवाल तिने केला आहे. मी कधीही स्वतः कोणताही दावा केलेला नाही. तुम्हाला खटकत असेल तर मला हुताम्या जवानाची मुलगी तुम्ही म्हणू नका. तुम्ही मला गुलमेहर म्हटले तरी चालेल, अशा शब्दांत तिने हुडा याला सुनावले.  
 

Web Title: Gurmehar Kaur drops out of #StudentsagainstABVP campaign