
Gyanvapi Mosque Case : शिवलिंग चाचणीस स्थगिती; ‘ज्ञानवापी’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली : वाराणसीतील प्रसिद्ध ज्ञानवापी मशिदीत आढळून आलेल्या कथित शिवलिंगाचा नेमका कालावधी निश्चित करण्यासाठी त्याची कार्बन डेटिंग चाचणी घेण्याबरोबरच मशिदीच्या संपूर्ण परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला पुढील सुनावणीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
तत्पूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ मे रोजी दिलेल्या आदेशांत मशिदीमध्ये आढळून आलेल्या कथित शिवलिंग सदृश्य रचनेचा आधूनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नेमका कालावधी निश्चित करण्यात यावा असे म्हटले होते.
दुसरीकडे मशिदीच्या व्यवस्थापनाने हा भाग वजू खान्याचाच घटक असल्याचे म्हटले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाच्या आदेशांना मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज याप्रकरणी सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र, उत्तरप्रदेश सरकार आणि हिंदू याचिकाकर्त्यांना नोटिसा बजावल्या.
ज्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली त्यामध्ये न्या. पी.एस. नरसिम्हा आणि न्या. के.व्ही.विश्वनाथ यांचाही समावेश होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काळजीपूर्वक पुढील पावले टाकावी लागतील असे नमूद केले तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल असेही सांगितले.
परिस्थितीचा अभ्यास करू
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशांविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हुजेफा अहमदी यांनी ही याचिका सादर केली होती. हिंदू पक्षकारांनी याचप्रकरणात सर्वप्रथम कॅव्हेट दाखल केले आहे.
हिंदू पक्षकाराच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, ‘‘ सर्वप्रथम पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा अहवाल मागवून त्यावर विचार करण्यात यावा.’’ त्यावर न्यायालयाने आम्ही त्या अहवालाचा देखील विचार करू असे सांगितले. आम्ही सुरूवातीला परिस्थितीचा अभ्यास करू. आम्हाला हे प्रकरण खूप सावधगिरीने हाताळावे लागेल असेही सरन्यायाधीशांनी सांगितले. मशिद समितीच्या वकिलांनी न्यायालयाच्या या भूमिकेचे स्वागत केले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होईल.