हाफिज सईदची याचिका राष्ट्रसंघाने फेटाळली

हाफिज सईदची याचिका राष्ट्रसंघाने फेटाळली

नवी दिल्ली : बंदी असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्याची दहशतवादी हाफिज सईदची याचिका संयुक्त राष्ट्रसंघाने आज फेटाळून लावली. जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख असलेला हाफिज हा 2008 मधील मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे.

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याची याचिका राष्ट्रसंघाच्या 1267 निर्बंध समितीसमोर असतानाच हाफिजचा हा अर्ज आला होता. मात्र, भारताने हाफिजच्या कारवायांबाबत सविस्तर माहिती राष्ट्रसंघाला पुरविल्यानंतर त्याची याचिका फेटाळण्यात आली. मुंबईवरील हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 मध्ये हाफिजचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. लाहोरमधील एका कायदा कंपनीच्या मार्फत हाफिजने 2017 मध्ये राष्ट्रसंघाकडे अर्ज करत नाव वगळण्याची विनंती केली होती. मात्र, हाफिजला या यादीत कायम ठेवण्यासाठी पुरेसे पुरावे आणि कारणे उपलब्ध असल्याचे राष्ट्रसंघाने स्पष्ट केले.

हाफिजच्या याचिकेला भारतासह अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटनने विरोध केला होता. मात्र, दहशतवाद्यांवर कारवाई सुरु केल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने हाफिजच्या या याचिकेला विरोध केला नव्हता. हाफिजचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत कायम राहिल्याने त्याच्यावरील प्रवासबंदी कायम राहणार असून त्याची संपत्तीही सरकारच्याच ताब्यात राहणार आहे. 

व्हिसा देण्यास पाकचा नकार 

दहशतवाद्यांच्या यादीतून नाव कमी करण्यासाठी हाफिज सईदने केलेल्या अर्जावर विचार सुरू असताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी हाफिजला भेटण्यासाठी पाकिस्तानकडे व्हिसाची मागणी केली होती. मात्र, पाकिस्तानच्या न्यूयॉर्कमधील वकीलातीने या अधिकाऱ्यांना व्हिसा नाकारला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, व्हिसा दिल्यास या अधिकाऱ्यांसमोर हाफिज नको ते बोलून बसेल आणि पाकिस्तान सरकार अडचणीत येईल, अशी भीती सरकारला होती. अखेर या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हाफिजशी संवाद साधला. नंतर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाचा आणि इतर पुराव्यांचा आधार घेत राष्ट्रसंघाने हाफिजचे यादीतील नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com