'निदान दाऊदला तरी आमच्याकडे सोपवा'

पीटीआय
रविवार, 17 मार्च 2019

पाकिस्तानने सध्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असले; तरीसुद्धा ती केवळ वरवरची मलमपट्टी असून, यामुळे दहशतवाद्यांना काहीही फरक पडणार नाही, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत पाकिस्तान प्रामाणिक असेल, तर त्यांनी किमान कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि सय्यद सल्लाउद्दीन यासारख्यांना तरी भारताच्या ताब्यात सोपवावे. भारतीय नागरिक असणारी ही मंडळी सध्या पाकिस्तानातच वास्तव्यास असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतरदेखील पाकिस्तानने "जैशे महंमद' आणि अन्य दहशतवादी संघटनांविरोधात अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. भारताने मांडलेल्या दहशतवादाच्या मुद्द्याप्रती आपण थोडेतरी गंभीर आहोत, हे दाखविण्यासाठी पाकिस्ताननेच दाऊद, सल्लाउद्दीन आणि अन्य दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे. कारण, ही मंडळी भारतीय आहेत, असे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी नमूद केले.

पाकिस्तानने सध्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असले; तरीसुद्धा ती केवळ वरवरची मलमपट्टी असून, यामुळे दहशतवाद्यांना काहीही फरक पडणार नाही, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

भारताने पुरावे दिले 

पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांना मूर्त रूप देणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या समन्वयकांबाबतची महत्त्वाची माहिती भारताने खुद्द पाकसमोरच सादर केली असून, अन्य तिसऱ्या देशाकरवी ती पडताळूनदेखील पाहिली जाऊ शकते, असेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत पाकिस्तानवर मोठा राजनैतिक दबाव आणला आहे. 

चीनचा तांत्रिक खोडा

"जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहरच्या नावाचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीसोबतचे काम सुरूच राहील, असेही भारताकडून आज स्पष्ट करण्यात आले. तत्पूर्वी, मसूदचे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत येऊ नये म्हणून चीनने त्यात तांत्रिक बाबींचा खोडा घातला होता.

यासंदर्भातील अन्य काही प्रलंबित मुद्दे चीनने पाकिस्तानसोबत निस्तरावे, असे सांगत चीनच्या मसूदविषयक भूमिकेबाबत भारताने तात्पुरती संयमाची भूमिका घेतली आहे. मसूदच्या नावाचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समावेश करण्याबाबत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या तीनही देशांची चीनसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते. अझहरचा या यादीत समावेश व्हावा म्हणून हे तीनही देश विशेष आग्रही असून त्यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handel Dawood Ibrahim to Us says India