Positive Story: 'मास्क-संजिवनी' देणारा 'हनुमान'; आतापर्यंत शिवून वाटले 6 हजार मास्क

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

गरजवंताना 'मास्कसंजिवनी' मोफत वितरीत करुन हे सारे 'हनुमान' एकप्रकारे कोरोनारुपी रावणाशीच लढत आहेत. 

कोरोना विषाणूच्या विषाणूच्या प्रादुर्भावाने सध्या संपूर्ण देशच वेठीला धरला गेला आहे. सोशल डिस्टंन्सिगचे पालन, हात स्वच्छ धुणे आणि सॅनिटायझरचा नियमित वापर आणि तोंड आणि नाक संपूर्णपणे झाकेल असा मास्कचा वापर ही आता काळाची गरज बनली आहे. जसजसे दिवस पुढे सरकत जात आहेत, तसतसे हे सारे नियम आता जगण्याचा भाग बनले आहेत. अनेकांचा रोजगार या काळात गेला. अनेक संकटे समोर असल्यावर सगळीकडे निराशा पसरायला लागते. मात्र, असं असलं तरी या कठीण काळातही काहीजण निस्वार्थीपणे सेवा करताना दिसतात.

गुजरात राज्यातील सूरत शहरात राहणारे हनुमान हे याच पद्धतीची निस्वार्थ सेवा करत आहेत. ते मास्क तयार करून त्याचे मोफत वितरण करण्याचे काम अविरतपणे करत आहेत. सध्या मास्क वापरणे म्हणजेच कोरोनाशी लढणे होय. मास्क हे कोरोनाविरोधातल्या लढाईचे शस्त्रच बनले आहे. अशा काळात अनेक गरीब आणि निराधार लोकांकडे स्वच्छ आणि सुस्थितीतला मास्क नसणे, ही वाईट बाब आहे. अशावेळी जे असे मास्क खरेदी करु शकत नाहीत, त्या लोकांसाठी हा हनुमान आता मास्क संजिवनी देणारा ठरला आहे. हनुमान यांनी सांगितलं की ते शहरातील टेलरकडून नको असलेल्या कापडाचे तुकडे जमा करतात आणि त्यापासून मास्क तयार करतात. गेल्या चार महिन्यांपासून ते हे काम न थकता करत आहेत. आजपर्यंत आपल्या  पत्नीसोबत त्यांनी सहा हजारहून अधिक मास्क यापद्धतीने मोफत वितरीत केले आहेत.

हेही वाचा - पूर्णिया हत्या प्रकरण - माझ्यावर कारवाई करा; तेजस्वी यादवांकडून नितीश कुमारांना पत्र

कोरोनाच्या या काळात मास्क आणि सॅनिटायझर ही जगण्याची नवी आयुधंच बनली आहेत. याआधी माहितही नसलेला सॅनिटायझर नावाचा द्रव पदार्थ आता न्यू-नॉर्मल झाला आहे. चेहऱ्यावरचा मास्क आता चष्म्याइतकाच चेहऱ्यावर सहज वावरतो आहे. सध्याच्या या गरजा लक्षात घेता मार्केटमध्ये या उत्पादनांची चलती आहे. अशावेळी अधिक पैसे उकळले जाण्याचीही शक्यता असते. अशावेळेला याप्रकारची निस्वार्थ सेवा माणुसकीचे दर्शन घडवते. सुजानगढमध्ये राहणाऱ्या एका टेलरने लोकांच्या सुरक्षेसाठी याचप्रकारचे काम हातात घेतले आहे. गरजवंतांना असे मास्क मोफत वितरीत करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक मास्क वितरीत केले आहेत. त्यांनी म्हटलंय की जोवर गरज भासेल तोवर ते हे काम करतच राहतील. 

हेही वाचा - ना घर का, ना घाट का; गुप्तेश्वर पांडेंना JDU ने तिकिट नाकारलं

राजस्तानमधील सालासर जिल्ह्यातील मुरडाकिया गावांतील चार महिला आणि एका इसमाने मिळून एक हजारहून अधिक मास्क बनवून त्याचे विनाशुल्क वितरण केले आहे. साहवा गावात टेलर असणाऱ्या शहनाज कुरेशी, इंद्राज मेघवाल, जयपाल छीपा यांनीदेखील याचप्रकारे गरवतांना आणि लहान शालेय वयातील मुलांना अशा मास्कचे वितरण केले आहे. अनेक सामाजिक संघटनदेखील याप्रकारे मास्क बनवून त्याचे वितरण करत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. देशावर संकटे येतील आणि जातीलही. मात्र, संकटे असताना त्याविरोधात लढताना माणुसकी आणि चांगुलपणाचा बळी जाता कामा नये, एवढी जरी खबरदारी घेतली गेली तरी मोठ्यातल्या मोठ्या संकटांविरोधात लढायला बळ मिळू शकतं. 'मास्कसंजिवनी' गरजवंताना मोफत वितरीत करुन हे सारे 'हनुमान' एकप्रकारे कोरोनारुपी रावणाशीच लढत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hanuman from gujarat is distributing free masks to needy