देशाची मान उंचावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांना लाख-लाख शुभेच्छा!

टीम ई-सकाळ
Sunday, 21 June 2020

एअरस्ट्राईकनंतर भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी आपली लढाऊ विमानं भारताच्या दिशेने पाठवली होती. पण भारताच्या हवाई दलाने अतिशय चोख उत्तर देत पाकच्या विमानांना हुसकावलं होतं. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती.

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा आज वाढदिवस. 21 जून 1983 मध्ये त्यांचा जन्म झाला. तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यापासून 19 किमी अंतरावर असणारे कांचीपूरम हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडिल एअरमार्शल म्हणून निवृत्त झाले. तर आई डॉक्टर आहेत. वडिलांच्या पावलावर पाउल टाकत अभिनंदन यांनी भारतीय हवाई दलात येण्याचे स्वप्न उराशी बाळगले. चन्नईतील सैनिक शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये पदवीच्या शिक्षणाला प्रवेश घेतला. 2004 मध्ये फ्लाइंग ऑफिसरचे ट्रेनिंग पूर्ण केले. 19 जून 2006 मध्ये फ्लाइट लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. त्यानंतर 2010 मध्ये भारतीय हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर 2017 मध्ये त्यांना विंग कमांडर पदी बढती मिळाली. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशीच भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी एफ-16 विमान खाली पाडून दाखवलेल्या अद्भुत शौर्याबद्दल अभिनंदन यांना वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी त्यांचा गौरव करण्यात आला.  

आशिया खंडातील या देशांचे किती आहे लष्करी बलाबल; वाचा सविस्तर

पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी अड्डे एअर स्ट्राईकच्या माध्यमातून उद्धवस्त केले होते. यावेळी पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी हे ठार झाले होते. भारताने थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून केलेल्या एअरस्ट्राईकनंतर भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी आपली लढाऊ विमानं भारताच्या दिशेने पाठवली होती. पण भारताच्या हवाई दलाने अतिशय चोख उत्तर देत पाकच्या विमानांना हुसकावलं होतं. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती.

मोठी बातमी : भारताची विमानं देणार चीनला प्रत्त्युत्तर

अभिनंदन यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमानाला खाली पाडलं. पण याच दरम्यान, त्याच्या मिग-21 या लढाऊ विमानाला अपघात झाला. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने उतरले. पण ते यावेळी पाक व्याप्त काश्मीरमध्ये लँड झाले होते. त्यानंतप पाकिस्तानी लष्कराने त्यांना आपल्या ताब्यात घेतलं होतं. पण पाकिस्तानच्या ताब्यात असताना देखील त्यांनी जो संयम आणि शूरपणा दाखवला त्याने त्यांनी कोट्यवधी भारतीयांची मनं जिंकून घेतली होती. विंग कमांडर अभिनंदन हे जवळजवळ 60 तास पाकिस्तानी लष्कराच्या कैदेत होते. यावेळी त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याच्या अनेक व्हिडिओ समोर आले होते. भारताने निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर 1 मार्चला पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन यांची सुटका केली होती.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Birthday Wing Commander Abhinandan Varthaman Wishes Special Stories