एका आठवड्यात बनविले ४५० राष्ट्र्रध्वज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Tiranga Campaign Azadi Ka Amrit Mahotsav 450 national flags made in one week

एका आठवड्यात बनविले ४५० राष्ट्र्रध्वज

पाटणा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम नुकताच देशभरात साजरा करण्यात आला. देशात राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली. बिहारमधील ९१ वर्षीय गांधीवादी लालमोहन पासवान यांनी एका आठवड्यात दररोज १२ तास काम करून सुमारे ४५० राष्ट्रध्वजांची निर्मिती केली. त्यातून, त्यांनी देशभक्तीला कुठलेही वय नसते, हेच दाखवून दिले. बिहारमधील नेपाळ सीमेवर सुपौल जिल्ह्यात निर्मली या छोट्याशा खेड्यातील पासवान स्वत:ला गांधीवादी मानतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद हे त्यांचे आदर्श आहेत. सध्याच्या कलहाने ग्रासलेल्या जगात शांतता नांदण्यासाठी महात्मा गांधींच्या अहिंसेचा संदेश हाच एकमेव मार्ग आहे, अशी त्यांची अतूट श्रद्धा आहे.

पासवान यांना ४५० राष्ट्रध्वजांची ऑर्डर मिळाली. वृद्धांना आधार देऊन त्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या ‘हेल्पेज इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने ही ऑर्डर दिली होती. जिल्हा समन्वयक ज्योतिश झा म्हणाले, की गेल्या आठ वर्षांपासून पासवान आमच्यासाठी काम करत आहेत. ते दिलेल्या वेळेत राष्ट्रध्वज बनवून देतील, याची खात्री होती. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी दाखविलेले धैर्य प्रेरणादायी आहे. हे राष्ट्रध्वज स्थानिक शाळा व कार्यालयांत देण्यात आले.

कर्जातून शिलाई मशिनची खरेदी

बिहारमध्ये २००८ मध्ये कोसी नदीच्या प्रलंयकारी पुरात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. सुदैवाने, पासवान व त्यांचे कुटुंबीय बचावले असले तरी त्यांचे घर, जनावरे डोळ्यादेखत वाहून गेले होते. पूरग्रस्त वृद्ध नागरिकांसाठी स्वमदत गट उभारण्याची प्रक्रिया सुरू असताना ‘हेल्पेज इंडिया’ संस्थेला पासवान सापडले. स्वमदत गटात सामील झाल्यावर त्यांना साडेसात हजारांचे कर्ज देण्यात आले. त्यातून, त्यांनी शिलाई मशिन खरेदी केली. उतरत्या वयातही शिलाईकाम शिकून ते महिना दीड हजार कमवू लागले.

केवळ आठवडाभरात एवढे राष्ट्रध्वज य वयात तयार करणे, हे खूपच आव्हानात्मक होते. मात्र, हे पवित्र कार्य होते. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी हे राष्ट्रध्वज सुपूर्द केले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

-लालमोहन पासवान, गांधीवादी

टॅग्स :Indian FlagDesh news