हडप्पन लोकांच्या सवयी समजणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hadappa

हडप्पन लोकांच्या सवयी समजणार

राखीगड (हरियाना) - हडप्पाकालिन राखीगड भागात उत्खनात सापडलेल्या सांगाड्यातून डीएनए मिळविण्यात यश आले असल्याने या काळातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी समजण्याची आशा संशोधकांना निर्माण झाली आहे. हे डीएनए शास्त्रीय अभ्यासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हरियानातील राखीगड हा हडप्पाकालिन ठिकाणच्या स्मशानभूमीत भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे सुरु असलेल्या उत्खननात दोन महिन्यांपूर्वी दोन महिलांचे सांगाडे आढळले होते. हे सांगाडे असलेल्या खड्ड्यांमध्ये काही भांडी आणि इतर काही वस्तूही आढळल्या. या वस्तूंचा आणि सांगाड्यांचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. ही स्मशानभूमी उत्खनन सुरु असलेल्या सातव्या क्रमांकाच्या ढिगाऱ्याखाली आहे. हा ढिगारा राखी खास आणि राखी शाहपूर या दोन गावांच्या बाहेर पसरलेला आहे. ही दोन्ही गावे हरियानातील हिसार जिल्ह्यातील राखीगड उत्खनन स्थळाचा हिस्सा आहेत.

हडप्पा काळात येथील शहरे अत्यंत सुनियोजित होती आणि ही ढिगाऱ्याची जागा स्मशानभूमी म्हणून वापरात होती. या स्मशानभूमीतून दोन महिलांचे सांगाडे मिळाले असून दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यातून डीएनएचे नमुने गोळा करण्यात आले, असे पुरातत्त्व विभागाचे सहमहासंचालक एस. के. मंजुल यांनी सांगितले. डीएनए नमुन्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ते सर्वप्रथम लखनौमधील बिरबल साहनी जीवाश्‍मशास्त्र संस्थेत पाठविले गेले असून नंतर मानवशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी न्यायवैद्यक विश्‍लेषण केले जाणार आहे.

काय माहिती मिळू शकते?

सांगाड्यांमधून काढलेल्या डीएनएच्या अभ्यासातून हडप्पा काळातील लोकांच्या पूर्वजांची माहिती मिळण्याच्या अंदाज असून त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही प्रकाश पडू शकतो, असे पुरातत्त्व विभागाचे सहमहासंचालक एस. के. मंजुल यांनी सांगितले. येथे राहणारे लोक मूळवंशीय होते की स्थलांतर करून आलेले होते, हे समजू शकते. दातांच्या अभ्यासावरून खाण्याच्या सवयी समजू शकतात.

Web Title: Harappan Will Understand Habits Of People Dna Obtained From Skeletons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HaryanaHistory
go to top