कुलभूषण खटल्यात साळवे यांची फी फक्त एक रुपया : सुषमा स्वराज

टीम इ सकाळ
मंगळवार, 16 मे 2017

एका नेटिझनने ट्विटरद्वारे "यापेक्षा कमी फीमध्ये एखादा चांगला भारतीय वकील मिळाला असता' असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्या ट्विटला उत्तर देताना स्वराज यांनी "हे योग्य नाही. हरिश साळवे यांनी आमच्याकडून या खटल्यासाठी केवळ एक रुपया फी आकारली आहे' असे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) खटला सुरू आहे. या खटल्यासाठी भारताने हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान साळवे यांची दररोजची फी 30 लाख रुपये असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्टीकरण देत साळवे यांची या प्रकरणाची संपूर्ण फी केवळ एक रुपया असल्याचे ट्‌विटरद्वारे सांगितले आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली होती. आता या प्रकरणी सुनावणी सुरू असून भारताकडून साळवे बाजू मांडत आहेत. त्यांनी युक्तिवाद करताना पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावून मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. दरम्यान साळवे यांची इतर प्रकरणांमधील फी तीस लाख रुपये प्रतिदिन आहे. याबाबतचे वृृत्त सोमवारी माध्यमांमध्ये पसरले होते. त्यावर एका नेटिझनने ट्विटरद्वारे "यापेक्षा कमी फीमध्ये एखादा चांगला भारतीय वकील मिळाला असता' असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्या ट्विटला उत्तर देताना स्वराज यांनी "हे योग्य नाही. हरिश साळवे यांनी आमच्याकडून या खटल्यासाठी केवळ एक रुपया फी आकारली आहे' असे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिले आहे.

पाकिस्तानने निकालावर अंमलबजावणी करणार का?
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणी जर भारताच्या बाजूने निकला दिला आणि कुलभूषण यांच्या फाशीची शिक्षा रद्द केली तर पाकिस्तान या निर्णयाची अंमलबजावणी करणार की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. पाकने आधीच व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या निकालाबाबत साशंका उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, पाकने जर न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला तर जागतिक बॅंकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला मोठ्या नाराजीला आणि असहकार्याला सामोरे जावे लागेल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Harish Salve has charged us Rs.1 as his fee for this case : Swaraj