हरियानात विधानसभा त्रिशंकू, दुष्यंत चौताला व अपक्षांना महत्त्व

ज्ञानेश्ववर बिजले
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणुकीत हरियानातील सर्व दहाही जागा जिंकल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही बहुमतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्रिशंकू स्थितीतील विधानसभेमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौताला आणि अपक्ष आमदारांना महत्त्व प्राप्त झाले आहे. हरियानात भाजपला 40, तर त्यापाठोपाठ काँग्रेस 31 जागा मिळाल्या आहेत. जेजेपीला दहा जागा मिळाल्या असून, उर्वरीत नऊ जागांपैकी सात जागांवर अपक्ष आमदार निवडून आले आहेत. लोकदल आणि हरियाना लोकहित पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. 

दुष्यंत चौताला यांची भूमिका अस्पष्ट
भाजप किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नसल्याचे दुष्यंत चौताला यांनी आज स्पष्ट केले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीला चर्चेसाठी बोलाविले आहे. हरियाना विधानसभेत एकूण 90 जागा असून, त्यापैकी बहुमतासाठी 46 जागांची आवश्यसकता आहे. सात अपक्ष आमदार कोणत्या पक्षांकडे वळणार आहेत, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. त्याचबरोबर चौताला यांच्याशी समझोता झाल्यास, भाजपला सत्तेवर येण्याची संधी लगेच मिळू शकेल. चौताला काँग्रेसकडे गेल्यास, त्या दोघांना अपक्ष आमदारांचीही सोबत घ्यावी लागेल. त्यामुळे, हरियानातील निर्णय थोडा अवघड झाला असल्याचे सध्या जाणवते. 

भाजपची दमछाक 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात भाजपने 90 पैकी 79 मतदारसंघात आघाडी घेतली होती. राष्ट्रवाद, विकासाचे मुद्दे, तसेच विरोधकांतील फाटाफूट यामुळे भाजपच सत्तेवर येणार असे वातावरण होते. एक्झिफट पोलमध्येही बहुतेक वृत्त वाहिन्यांनी भाजपला 57 ते 75 या दरम्यान जागा सांगितल्या होत्या. मात्र, आज निकाल जाहीर होऊ लागल्यानंतर भाजपची बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दमछाक होऊ लागल्याचे स्पष्ट झाले. 

लोकदलाचे पानिपत 
हरियानातील मुख्य विरोधी पक्ष लोकदलातील अनेक आमदार भाजपमध्ये गेले होते. लोकदलाचे विरोधी पक्षनेते अभय चौताला हे एकटेच निवडून आले. लोकदलात फूट पडल्यानंतर दुष्यंत चौताला यांनी दहा महिन्यांपूर्वी जेजेपी स्थापन केली. त्यांनी दहा जागा जिंकल्याने, त्यांच्या पक्षाला आता हरियानाच्या राजकारणात महत्त्व प्राप्त होणार आहे. हरियानाच्या राजकारणात गेली तीन दशके महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकदलाचे पानिपत झाले आहे. 

काँग्रेसच्या जागा दुप्पट
काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर वादविवाद रंगले. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यानंतर, काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थिती गेल्या महिनाभरात मजबूत केली. त्यांना आणखी काही काळ मिळाला असता, तर हरियानातील चित्र वेगळे दिसले असते. गेल्या निवडणुकीत भाजप 47, लोकदल 19, काँग्रेसच्या 15 आणि इतरांच्या नऊ जागा होत्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा दुप्पट झाल्या आहेत, तर भाजपच्या जागा घटल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana assembly election 2019 result fractured mandate congress ncp jjp