भाजप नेत्याने रुग्णवाहिका रोखल्याने रुग्णाचा मृत्यू 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

...तर नाक रगडून माफी मागेन 
हे प्रकरण अंगाशी येणार याची जाणीव झालेल्या दर्शन नागपाल यांनी मृताच्या घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. नंतर माध्यमांसमोर आलेल्या नागपाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपण असे काहीच केले नसल्याचा खुलासा केला. जर मी यात दोषी असल्याचे निष्पन्न झाले, तर भर रस्त्यात नाक रगडून माफी मागेन, असे नागपाल यांनी स्पष्ट केले. 

फतेहाबाद : भाजप नेते व फतेहाबाद नगर परिषदेचे नगरसेवक दर्शन नागपाल यांच्या गाडीला एका रुग्णवाहिकेने धडक दिल्यानंतर त्यांनी तब्बल अर्धा तास ही रुग्णवाहिका रोखून धरल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णवाहिकेतील रुग्णावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृताच्या कुटुंबीयांनी नागपाल यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे. 

येथील नवीन कुमार या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेले जात होते. लाल बत्ती चौकात ही रुग्णवाहिका नागपाल यांच्या गाडीला घासली. यावरून संतप्त झालेल्या नागपाल यांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करत तिचा मार्ग रोखून धरला. हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता. रुग्णवाहिका जेव्हा रुग्णालयात पोचली. तेव्हा त्यातील नवीन कुमारचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 

तत्पूर्वी नवीनच्या कुटुंबीयांनी नागपाल यांना नवीनची प्रकृती बिकट असल्याची कल्पना देत रुग्णवाहिका सोडण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत नागपाल व त्यांचा चालक नुकसान भरपाईसाठी अडून बसले होते. इतर नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर रुग्णवाहिकेला सोडण्यात आले. 

...तर नाक रगडून माफी मागेन 
हे प्रकरण अंगाशी येणार याची जाणीव झालेल्या दर्शन नागपाल यांनी मृताच्या घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. नंतर माध्यमांसमोर आलेल्या नागपाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपण असे काहीच केले नसल्याचा खुलासा केला. जर मी यात दोषी असल्याचे निष्पन्न झाले, तर भर रस्त्यात नाक रगडून माफी मागेन, असे नागपाल यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Haryana: BJP leader accused of stalling ambulance, causing patient’s death