'खोदा पहाड़, निकली चुहिया, वह भी मरी हुई..'; खट्टर यांची सोनिया गांधींवर टीका

वृत्तसंस्था
Monday, 14 October 2019

राहुल गांधींनंतर सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्यात आले, यावरून खट्टर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.   

चंदीगड : विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हरियानातील प्रचारसभा जोरदार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत. यातच हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. राहुल गांधींनंतर सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्यात आले, यावरून खट्टर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.   

'मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार'

हरियानातील एका प्रचारसभे दरम्यान खट्टर म्हणाले, 'लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले व सांगितले की नवीन अध्यक्ष गांधी कुटूंबातील नसेल. या निर्णयाचे आम्ही स्वागत केले व घराणेशाहीविरूद्ध काँग्रेसने पाऊल उचलल्याने हा निर्णय चांगला घेतला होता. त्यांनी अध्यक्षपदासाठी शोध सुरू केला, आणि तीन महिन्यांनंतर पुन्हा सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्ष म्हणून जाहीर केले. म्हणजे हे असं झालं की, खोदा पहाड़, निकली चुहिया, वह भी मरी हुई...' अशा भाषेत खट्टर यांनी सोनिया गांधींवर टीका केली. 

या सर्व प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हणले आहे की, 'खट्टर यांच्या या खालच्या पातळीवरील वक्तव्य हे महिलांसाठी अपमानास्पद आहे. या असामाजित वक्तव्याचा जाहीर निषेध. या वक्तव्यासाठी सोनिया गांधी व देशातील सर्व महिलांची खट्टर यांनी माफी मागावी.' काँग्रेसने #MaafiMaangoKhattar हा हॅशटॅगही सुरू केला आहे. तसेच भाजप किती महिलांविरोधी आहे हे खट्टर यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते, असेही म्हणले आहे. 

भाजपचा बीसीसीआयमध्ये शिरकाव; अमित शहांचे पुत्र सचिव

2014 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मनोहरलाल खट्टर यांनी आजपर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कलम 370 हटविल्यानंतरही खट्टर यांनी जम्मू-काश्मीर मधील महिलांविषयी अशोभनीय वक्तव्य केले होते. यावेळीही त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली होती.  

राम जन्मभूमीची सुनावणी पुन्हा सुरू; 17 ऑक्टोबरला होणार अंतिम सुनावणी

आज राहुल गांधी यांची हरियाना येथे जाहीर सभा होणार आहे. यामुळे खट्टर यांच्या बालेकिल्ल्यात आज राहुल गांधी त्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana CM Manoharlal Khattar criticizes Sonia Gandhi badly