अजय माकनांचा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी, कुलदीप बिश्नोईंची होणार पक्षातून हकालपट्टी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haryana Rajya Sabha Election

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अजय माकन यांचा पराभव झालाय.

अजय माकनांचा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी, बिश्नोईंची होणार पक्षातून हकालपट्टी!

Haryana Rajya Sabha Election : हरियाणात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलाय. त्यांचे ज्येष्ठ नेते अजय माकन (Ajay Maken) यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झालाय. काँग्रेस पक्षानं निवणुकीपूर्वीच आपला विजय घोषित केला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळं समीकरणं इतकी बिघडली की, अपक्ष कार्तिकेय शर्मा राज्यसभेत पोहोचले.

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट करणाऱ्या कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांच्यावर कारवाई करण्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कुलदीप बिश्नोई यांना CWC सदस्यत्वातून काढून टाकण्याची, तसंच त्यांना पक्षातून निलंबित करण्याची तयारी करत आहे. याशिवाय विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यासाठीही सभापतींना पत्र दिलं जाणार आहे.

याच दरम्यान, कुलदीप बिश्नोई यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधलाय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'फन कुचलने का हुनर आता है मुझे, सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते.' असं त्यांनी नमूद केलंय. बिश्नोई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत देऊनही त्यांच्या ट्विटर अकाऊंटची कव्हर इमेज बदललेली नाहीय. त्यांच्या कव्हर इमेजमध्ये गांधी घराण्यातील लोक आहेत.

हेही वाचा: Congress : एका मतानं बिघडलं गणित अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचा झाला पराभव

माकन का हरले?

रिटर्निंग ऑफिसर आरके नंदल यांनी सांगितलं की, भाजप नेते पंवार यांना 36 मतं मिळाली, तर कार्तिकेय शर्मा यांना 23 प्रथम पसंतीची मतं मिळाली आणि 6.6 मतं भाजपकडून हस्तांतरित झाली. त्यांची एकूण मतांची संख्या 29.6 झाली. या लढतीत माकन यांना 29 मतं मिळाली. मात्र, दुसऱ्या पसंतीचं मत न मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा: अशोक गेहलोत यांना राजकारणातला 'जादूगार' का म्हणतात माहितीय? जाणून घ्या खास गोष्टी

89 आमदारांनी केलं मतदान

राज्यसभा निवडणुकीत एक मत 100 इतकं मानलं जातं. हरियाणात 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केलं, तर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. शिवाय, काँग्रेसचं एक मत निवडणूक आयोगानं रद्द केलं. त्यामुळं 88 मतं शिल्लक होती, म्हणजे 8800 मतं. दरम्यान, विजयासाठी 8800/3+1 म्हणजेच 2934 मतांची गरज होती. भाजपचे कृष्णलाल पंवार यांच्या विजयानंतर 66 मतं शिल्लक होती, जी कार्तिकेय यांच्याकडं हस्तांतरित करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना 29-29 (2900-2900) मतं मिळाली. दोघंही समान होते, पण भाजपला 66 मतं मिळाल्यानं कार्तिकेयची मतं 2966 झाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसला क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध ठरल्यानं हा सारा खेळ अंगलट आलाय.

Web Title: Haryana Congress Sources Will Be Action Against Kuldeep Bishnoi Who Cross Voted In Rajya Sabha Polls

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top