हरियानात आता नवा जाट स्ट्राँगमॅन

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

सध्या शिक्षक भरती गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले त्यांचे पिता अजय चौताला यांनी आज आपल्या मुलाबाबत दिलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी होती. 

चंडीगड : यंदा हरियाना विधानसभेच्या ताज्या निकालांनी राज्याच्या सारीपाटावरील चित्रच पालटून टाकले, माजी उपपंतप्रधान आणि जाटस्ट्रॉंग मॅन देवीलाल यांचे सक्षम वारसदार म्हणून त्यांचे पणतू दुष्यंत चौताला यांचा उदय झाला आहे. सध्या शिक्षक भरती गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले त्यांचे पिता अजय चौताला यांनी आज आपल्या मुलाबाबत दिलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी होती. 

‘आज लोक मला दुष्यंतचा पिता म्हणून ओळखतात, ही माझ्यासाठी खरोबरच अभिमानाची गोष्ट आहे. केवळ दहा महिन्यांमध्ये दुष्यंतने पक्ष उभा केला आहे. त्याची ही कामगिरी कौतुकास्पदच म्हणावी लागेल,’ अशी भावना अजय चौताला यांनी व्यक्त केली. दुष्यंत यांचा ‘जेजेपी’ दहा जागा मिळवत किंगमेकर ठरला आहे. दुष्यंत यांच्या पक्षाचे दहा आणि सात अपक्षांना सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या शिष्टाईमुळे दुष्यंत चौताला यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचा खरा कस खट्टर यांच्यासोबत काम करताना लागेल. पक्षाचा मूळ भाजपविरोधी पाया कायम ठेवताना त्यांना सरकारशी जुळवून घ्यावे लागेल. 

दुष्यंत यांची शरीरयष्टी ही त्यांचे पणजोबा देवीलाल यांच्याशी बरीच मिळतीजुळती आहे. सहा फूट चार इंच उंची, आवाजातील जरब आणि करारी स्वभाव यामुळे हरियानातील जाट तरुण त्यांच्या प्रेमात पडला. शिक्षकभरती गैरव्यवहारामुळे कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी तुरुंगात गेली असताना दुष्यंत यांनी त्यांचा सवतासुभा मांडण्याचा निर्णय घेतला होता. हिमाचलमधील प्रतिष्ठित लॉरेन्स स्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या दुष्यंत यांनी कायदा आणि जनसंवाद शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. संसदेतील सक्रिय खासदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana election result 2019 dushyant chautala new face jaat community marathi information