कोव्हॅक्सिनची ट्रायल घेणाऱ्या हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोना

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 December 2020

20 नोव्हेंबर रोजी त्यांना कोरोना लस देण्यात आली होती. 67 वर्षीय अनिल विज हे स्वच्छेने कोरोनाची लस घेण्यासाठी तयार झाले होते.

नवी दिल्ली- कोरोना लसीच्या चाचणीत भाग घेणारे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना अंबाला कँट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विज यांनी शनिवारी टि्वट करुन याची माहिती सर्वांना दिली. 

अनिल विज यांनी टि्वटमध्ये म्हटले की, मला कोरोनाची लागण झाली असून अंबाला कँट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझा सल्ला आहे की, त्यांनीही त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. 

हेही वाचा- ऑनलाईन्स गेमिंगच्या जाहिराती आधी वैधानिक इशारा हवाच; केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स

अनिल विज हे कोरोनापासून बचावासाठी भारत बायोटेकच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी व्हॉलेंटियर बनले होते. 20 नोव्हेंबर रोजी त्यांना कोरोना लस देण्यात आली होती. 67 वर्षीय अनिल विज हे स्वच्छेने कोरोनाची लस घेण्यासाठी तयार झाले होते. कोव्हॅक्सिनची लस स्वदेशी पद्धतीने विकसित केली जात आहे. 

हेही वाचा- GHMC Election: हैदराबादमध्ये भाजपची लांब उडी, 4 वरुन थेट 48

दरम्यान, हरियाणामध्ये शुक्रवारी कोरोनाची बाधा झालेले 1602 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 2,40,841 इतकी झाली आहे. त्याचबरोबर 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा हा 2,539 वर गेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार, राज्यात आता 14,329 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात बरे होण्याचा दर 93 टक्के आहे. राज्यातील गुरुग्राममध्ये 423 आणि फरिदाबादमध्ये 336 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana health minister Anil Vij tests positive for COVID 19 COVAXIN was taken 15 days ago