डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जुळले भावाचे नाते

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मरोरा गावात 140 घरे असून, केवळ 45 घरांमध्येच शौचालये बांधलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमानुसार "सुलभ'ने गावात 95 शौचालये बांधली आहेत.
मोनिका जैन, उपाध्यक्ष, "सुलभ'

गुरुग्राममधील मरोरातील महिलांनी पाठविल्या राख्या; गावाला भेट देण्याचे निमंत्रण

गुरुग्राम (हरियाणा): राखीच्या धाग्याने बहीण व भावाच नाते अधिक घट्ट होते. राखीचे अतूट बंधन बहिणीच्या सुरक्षेची जाणीव भावाला करून देत असते. भारतात राजेरजवाड्यांच्या काळात राज्यांमधील वैरभाव टळावा, यासाठी राजघराण्यातील महिला शत्रू राज्यातील राजाला राखी बांधत असत, हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. ही परंपरा लक्षात घेत भारत व अमेरिकेतील संबंध अधिक बळकट होण्यासाठी हरियानातील मेवात भागातील मरोरा गावातील महिला व मुलींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राख्या पाठविल्या आहेत.

मुस्लिम बहुल असलेले मरोरा हे गाव "सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन' (एसआयएसएसओ) या सामजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. भारत व अमेरिकेतील संबंध दृढ व्हावेत या इच्छेने येथील महिला व मुलींनी ट्रम्प यांना एक हजार एक राख्या पाठविण्याचा निश्‍चय केला आहे. "एसआयएसएसओ'प्रमुख बिंदेश्‍वर पाठक यांनी या गावाचे नाव बदलून "ट्रंप व्हिलेज' असे केले होते. यामुळे हे गाव चर्चेच आले होते. गावाच्या नावात बदल करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले होते. नव्या नावाचे फलक हटविण्याचा आदेशही त्यांनी संघटनेला दिला होता. या फलकांवर गावाच्या नावासह ट्रम्प यांचे छायाचित्रही होते. गुरुग्रामपासून 60 कि.मी. अंतरावरील पुन्हाना तहसीलमध्ये मरोरा गावाचा समावेश होतो. गावाची लोकसंख्या एक हजार 800 आहे.

"गावातील महिला व मुलींसाठी "एनजीओ'ने अनेक कल्याणकारी उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थिनींनी डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असलेल्या अनुक्रमे एक हजार एक व 501 राख्या तयार केल्या आहेत. येथील महिला व मुली या दोघांना आपला मोठा भाऊ मानतात,'' असे "सुलभ'च्या उपाध्यक्षा मोनिका जैन यांनी सांगितले. राखी पौर्णिमेच्या सोमवारी (ता. 7) दिवशी ट्रम्प यांना राख्या मिळाव्यात, यासाठी गावातून शुक्रवारीच पाठविण्यात आल्या आहेत. गावाला भेट देण्याचे निमंत्रणही या दोघांना ग्रामस्थांनी पाठविले आहेत.

पंतप्रधानांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राखी बांधण्याची इच्छा मरोरामधील विधवा महिलांनी व्यक्त केली आहे. ""ट्रम्प भैयासाठी मी तीन दिवसांत 150 राख्या तयार केल्या आहेत. आमच्या गावाला पंतप्रधान मोदी यांच्यासह भेट द्यावी, अशी इच्छा येथील मुलींची असल्याचे पत्र व्हाइट हाउसला देण्यासाठी लिहिले आहे,'' असे 15 वर्षांच्या रेखा राणी या मुलीने सांगितले.

Web Title: haryana news donald trump and rakhi purnima