120 महिलांवर बलात्कार करणारा महंत अटकेत

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

120 महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 60 वर्षांच्या एका महंत बाबाला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. 

चंदीगड(हरियाणा) - 120 महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 60 वर्षांच्या एका महंत बाबाला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. या बाबाचे नाव महंत बाबा अमरपुरी असे आहे. या बाबाने तब्बल 120 महिलांवर बलात्कार केला आहे. याचा कळस म्हणजे त्याने हे कृत्य करत असताना त्याच्या व्हिडिओ क्लीप तयार केल्या आहेत. त्यानंतर या महंत भोंदूबाबाने व्हिडिओंद्वारे महिलांना ब्लॅकमेल करण्याचे काम केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी बाबा अमरपुरीला अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती फतेहबाद पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक बिमला देवी यांनी दिली आहे. या महंत भोंदू बाबावर बलात्कार, विनयभंग याबरोबर, इतर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही वागला नाहीत तर तुमच्या या व्हिडिओ क्लिप मी सोशल मिडियात व्हायरल करेल, अशा स्वरुपाच्या धमक्या पिडित स्त्रियांना हा बाबा द्यायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महंत बाबावर आयटी अॅक्टच्या कलमांनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भोंदूबाबावर 9 महिन्यांपूर्वी बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या पतीने यासंबंधीची तक्रार नोंदवली होती. या भोंदूबाबाने मंदिरातच बलात्कार केला, असेही या तक्रारीत म्हटले होते.

Web Title: Haryana temple mahant arrested for allegedly raping 120 women