हाथरस प्रकरण : मुख्य आरोपीविरोधात गुन्हा; उच्च न्यायालयात आज सुनावणी

पीटीआय
Monday, 12 October 2020

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आज (ता.१२) पासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य बड्या पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

लखनौ - उत्तरप्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अधिकृतरित्या आपल्या हाती घेतल्यानंतर कारवाईची चक्रे वेगाने  फिरू लागली आहेत. सीबीआयने काल या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याच्याविरोधात विविध कलमांखाली तीन गुन्ह्यांची नोंद केली. सीबीआयच्या लखनौ युनिटचे गाझियाबादेतील पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आज (ता.१२) पासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य बड्या पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आज होणाऱ्या सुनावणीस पीडितेचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली पण काल दुपारपर्यंत याबाबतचा कोणताही अधिकृत निरोप मात्र त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. पीडितेच्या कुटुंबीयांनी मात्र आज रात्री घरातून बाहेर पडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, आमच्या जिवाला धोका असल्याने आम्ही रात्री घर सोडणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे उद्या सकाळीच ते घरातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साक्षीदारांना सुरक्षा कवच
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पीडितेच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या घटनेच्या साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी चार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पीडितेच्या परिवाराशी संवाद साधणार असल्याची चर्चा आहे पण त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान हाथरसमधील पीडितेची नातेवाईक असल्याचे सांगून त्यांच्यासोबत राहत असलेल्या राजकुमारी बन्सल या महिलेला जबलपूरमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाने नोटीस देखील बजावली आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शासकीय  कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होता येत नाही, असे या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras case Hearing in the High Court today