हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांची पीडितेच्या कुटुंबीयांना धमकी; मीडियावाले आज आहेत, उद्या नसतील

वृत्तसंस्था
Friday, 2 October 2020

उत्तर प्रदेशातील  हाथरसच्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली असून, स्थानिक प्रशासनाचा मुजोरपणा यानिमित्ताने उघड झाला आहे. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांनी जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागला असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी कुटुंबीयांना उघड धमकी देताना दिसत आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशातील  हाथरसच्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली असून, स्थानिक प्रशासनाचा मुजोरपणा यानिमित्ताने उघड झाला आहे. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांनी जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागला असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी कुटुंबीयांना उघड धमकी देताना दिसत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘उद्या मीडियावाले निघून जातील पण प्रशासन येथेच असेल,’’ असे जिल्हाधिकारी बोलताना दिसत आहेत. ‘‘तुम्ही तुमची विश्वासार्हता घालवू नका, अर्धे मीडियावाले आताच निघून गेले आहेत आणखी अर्धेजण सकाळी निघून जातील, सायंकाळी चारपर्यंत उरलेसुरले सगळेच परतीचा मार्ग धरतील. आता जबाब बदलायचा की नाही, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे,’’ असा सूर जिल्हाधिकारी आळवताना दिसत आहेत.  प्रवीणकुमार यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.

भदोहीमध्येही अत्याचार
भदोहीमध्येही दलित समाजातील मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. नराधमांनी ठार मारण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 
गोपीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला ठार मारले आणि नंतर तिचा मृतदेह शेतामध्ये फेकून दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हाथरसमधील दलित मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी तिच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची परवानगी न घेताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ही अधिक लाजीरवाणी गोष्ट आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री प. बंगाल

हाथरसमधील घटनेनंतर राज्य सरकार दोषींवर कठोर कारवाई करेल अशी आमची अपेक्षा होती, पण बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर अत्याचार करण्यात आले. भाजपच्या राजवटीमध्ये गुन्हेगार, माफिया आणि बलात्कारी मोकाटपणे फिरत आहेत, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. केंद्राने योगींना गोरखमठात पाठवावे ते शक्य नसेल, तर त्यांना राममंदिराच्या उभारणीचे काम द्यावे.
- मायावती, सर्वेसर्वा बहुजन समाज पक्ष

हाथरस, बलरामपूरच्या घटना दुर्दैवी आहेत, महाराष्ट्रामध्ये हे सहन केले जाणार नाही. महिला अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांना चाप लावायला हवा.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र

पीडितेला एम्समध्ये नेण्याची शिफारस होती
अलिगड - हाथरसमधील ज्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हाथरसच्या पीडितेवर उपचार करण्यात आले तेथील प्राचार्यांनी संबंधित पीडितेला पुढील उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण तिला अचानक सफदरजंग रुग्णालयामध्ये का दाखल करण्यात आले, हे  आपल्याला अद्याप समजले नसल्याचे प्राचार्य शाहीद अली सिद्दीकी यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras District Collector threatens victims family