हाथरसला जाण्यापासून प्रियांका गांधींना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त; कलम 144 लागू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

प्रियांका गांधींना हाथरसमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना बाहेरच थांबवलं जाऊ शकतं.

लखनऊ -  उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी जाणार आहेत. दरम्यान, हाथरसमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कलम 144 लागू करण्यात आले आहे. प्रियांका गांधींना हाथरसमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना बाहेरच थांबवलं जाऊ शकतं. 

एसपी विक्रांत वीर यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गांधी हाथरसमध्ये येणार असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसंच कोणालाही हाथरसला येऊ दिलं जाणार नाही. राजकारणामुळे गर्दी वाढू शकते आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमेवरच त्यांना थांबवलं जाईल. 

हाथरसमध्ये बुधवारी झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. शांतता भंग करणाऱ्या 145 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह 25 ज्ञात व 120 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंडविधान कलम 147, 149, 332, 353, 336, 347, 427 आणि 3 नुसार हे गुन्हे नोंद केले आहेत. तसंच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकेही तयार केली आहेत. बुधवारी पीडितेच्या मृत्यूनंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर जमावाने सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras gangrape up congress rahul gandhi and priyanka likely visit to family