Hathras Case - अटेकपूर्वी राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की; फोटो व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना मारहाणही झाली आहे. 

हाथरस - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना मारहाणही झाली आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि खाली पाडलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. 

राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राहुल गांधी यांच्या हातालासुद्धा दुखापत झाल्याचं एका फोटोत दिसत असून प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. 

Image

दरम्यान, या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही या ठिकाणी नव्हतो मात्र या प्रकाराची चौकशी केली जाईल. कलम 188 अंतर्गत राहुल गांधींवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Image

पोलिसांनी राहुल गांधी यांना अडवताना थेट कॉलर धरली. एवढंच नाही तर त्यांना धक्काबुक्की करत जमिनीवरही पाडलं आणि लाठीचार्जही केला. याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Image

राहुल गांधींच्या अटकेनंतर देशातील अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उत्तर पोलिसांच्या कारवाईवरून टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरस पीडितेची भेट घेण्यासाठी येणार असल्याचं समल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. सीमेवर कडेकोट बंदोबस्तही करण्यात आला होता. गाड्या यमुना एक्सप्रेस वेवर अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी चालत हाथरसकडे जाण्यास सुरुवात केली. यावेळीच त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras ganrape case rahul gandhi arrest up police lathicharge photo viral