कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

गोरक्षणास जातीय रंग न देता सर्वांनी एकत्र येऊन या मुद्यावर भूमिका घ्यावयास हवी. या प्रकरणाचे करण्यात येत असलेले राजकारण देशाच्या हिताचे नाही

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोणासही कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याचा अधिकार नसल्याचा कडक इशारा गोरक्षकांना दिला आहे.

याचबरोबर, गोरक्षणाच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी, असे पंतप्रधानांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी आज (रविवार) यासंदर्भातील माहिती दिली.

"देशामध्ये गोरक्षणाचा कायदा आहे. मात्र गोरक्षणाच्या नावाखाली वैयक्तिक शत्रुत्वापोटी गुन्हे करणे क्षम्य नाही,'' असे पंतप्रधान म्हणाले. याचबरोबर, काही राजकीय पक्षांकडून गोरक्षणाच्या या मुद्यास राजकीय स्वार्थाकरिता जातीय रंग देण्यात येत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली.

"गोरक्षणास जातीय रंग न देता सर्वांनी एकत्र येऊन या मुद्यावर भूमिका घ्यावयास हवी. या प्रकरणाचे करण्यात येत असलेले राजकारण देशाच्या हिताचे नाही,' अशी भूमिका पंतप्रधानांकडून स्पष्ट करण्यात आली. गेल्या महिन्यामध्येही पंतप्रधानांकडून यासंदर्भात बोलताना गाईच्या नावाखाली हिंसा करणे समर्थनीय नसल्याचा इशारा देण्यात आला होता.

Web Title: Have asked states to take strict action against cow vigilantes: PM Modi