डिजिटल बलात्कार प्रकरण : आरोपीला जामीन मंजूर, पीडितेचा थयथयाट

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

आरोपीला जामीन मंजूर केल्याने व्हिडिओद्वारे व्यक्त केला संताप 

नवी दिल्ली ः अमेरिकेची नागरिक असलेल्या एका महिलेवरील डिजिटल बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याला ठोठविण्यात आलेल्या सात वर्षांच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या पीडित महिलेने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, भारताच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील वकिलातीकडूनही आपल्याला मदत मिळाली नाही, असा आरोप तिने केला आहे. बोटांच्या साहाय्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराला डिजिटल बलात्कार अशी संज्ञा वापरली जाते. 

सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय वकिलातीसमोर उभे रहात पीडित महिलेने स्वतःचा व्हिडिओ शूट केला असून, तो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केला आहे. भारतीय वकिलातीमधील कर्मचाऱ्यांकडून आपल्याला मदत नाकारण्यात आल्याचा दावा महिलेने व्हिडिओमध्ये केला आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तीला जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण? 
डिजिटल बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेने आरोपी राजीव पंवार याचे दिल्लीतील घर भाड्याने घेतले होते. 2013मध्ये संबंधित महिला आपल्या पतीसह तेथे रहात होती. पीडित महिलेने जून 2013मध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती. याप्रकरणी पंवार याला फेब्रुवारी 2019मध्ये न्यायालयाने दोषी ठरविले. तसेच, त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. पंवार याने शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पाच जुलै रोजी उच्च न्यायालयाने पंवार याला जामीन मंजूर करत शिक्षेला स्थगिती दिली होती. बलात्कार प्रकरणात शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला जामिनावर सोडण्याला पीडित महिलेने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, आरोपी पंवार हा पाच महिने कोठडीमध्ये होता, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HC grants bail to man accused of raping US woman