गुरुजींची आर्त हाक... आम्ही शिकवायचं तरी कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी सर्वांत ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या शिक्षकांना वेठीस धरता येते, हे आजपर्यंतच्या सरकारी कामकाज पद्धतीवरून सिद्ध झाले आहे.

गुरुजींची आर्त हाक... आम्ही शिकवायचं तरी कधी?

संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांवर लादलेल्या तब्बल १५१ अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वर्गावर कमी अन् शाळेबाहेरच जास्त दिसू लागले आहेत. आधीच कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीतील शिक्षणापासून कोसो दूर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत असतानाच या विचित्र कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस खालावत चालल्याची चिंता आहे. भविष्यात या बाबींचा विचार होण्याची खरी गरज आहे.

कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी सर्वांत ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या शिक्षकांना वेठीस धरता येते, हे आजपर्यंतच्या सरकारी कामकाज पद्धतीवरून सिद्ध झाले आहे. आता तरी खूपच बरे दिवस आहेत; नाहीतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही शिक्षक मंडळी गावोगाव फिरत होती. दर दहा वर्षांनी जनगणनेचे कामही या शिक्षकांची वाटच पाहते. विविध निवडणुकांचे कर्तव्य पार पाडणे, राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कल्पकतेतून नवनवे समोर येणारे उपक्रम, शाळेत खिचडी शिजविण्यापासून अनेक शासकीय योजनांची वेगवेगळ्या पद्धतीने वारंवार मागितली जाणारी माहिती सादर करताना नाकीनऊ येतात. स्वातंत्र्याच्या ७५व्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षात आपण अजूनही शिक्षणासारख्या पायाभूत सुविधांमध्येही म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही, इतकेच नव्हे तर रस्ते, ड्रेनेज, वीज आणि पाणी या माफक अपेक्षांचीही पुर्तताही झाली नसल्याची खंत आहे. जिल्हा परिषद शाळेत वीजबिलाची तरतूद नसल्यामुळे अनेक संगणक धूळखात पडले आहेत, मग नवनवीन तंत्रज्ञान वापरात येणार तरी कसे, हा प्रश्न आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनासारख्या महामारीमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे ग म भ न या मुळाक्षरांचेही ज्ञान मिळवू न शकलेल्या विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीचे आव्हान असतानाच आपल्यावर सोपविलेल्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकच सतत व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा एकशिक्षकी, द्विशिक्षकी असल्याने तेथील चित्र तर फारच विदारक आहे. शासनाने नेमून दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे मुळात शिक्षकच शाळेवर नसल्याने त्याचा फोटो शाळेत लावला काय अन् न लावला काय, सगळे ‘मुसळ केरातच’ अशी स्थिती होणार आहे. वर्षभरात १५१ अशैक्षणिक आणि खर्डेघाशीची कामे करण्याच्या नादात शाळेत किती वेळ अन् किती दिवस शिक्षक उपस्थित राहणार? त्यांचे विद्यार्थ्यांशी नाते व पालकांशी संबंध कसे जुळणार? अशी अनुत्तरीत करणारी प्रश्‍नावली मोठी आहे. त्यातच भरीस भर म्हणून राज्यभरात शिक्षकांची ३१ हजार पदे रिक्त आहेत. या कामाचा अतिरिक्त भारही असतोच.

स्वातंत्र्यदिन साजरा करणे हे आद्यकर्तव्य मानून शिक्षकांनी ते साजरे केले. हा आनंदोत्सव चोख व उत्तमपणे पारही पडला. परंतु, त्या व्यतिरिक्त पडलेल्या जबाबदाऱ्यांचे कसे, असा प्रश्‍न गुरुजींकडून विचारला जात आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या बांधवांची व्यवस्था करण्यापासून ते पीक-पाणी पंचनाम्यापर्यंत अशैक्षणिक कामे करता-करता गुरुजी अक्षरशः या कामाच्या ओझ्याखाली वाकला आहे.

केवळ ऑगस्टमधील अशैक्षणिक कामे

केवळ एका ऑगस्ट महिन्याचा शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण पाहिला तर त्यांच्यावर शिक्षणाच्या मूळ कामाव्यतिरिक्त कोणकोणत्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडल्या होत्या, ते पाहता येईल.

- बीएलओ (मतदान अधिकारी) : शिक्षकांना मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याचा आदेश, उद्दिष्ट, त्याची पूर्तता करण्यासाठी तहसीलमध्ये बैठका, व्हॉट्‌सॲप संदेश, पुन्हा तत्काळ बैठक

- हर घर तिरंगा : जनजागृती, प्रभातफेरी, गृहभेटी, विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणीचे आदेश

- दशसूत्री उपक्रम : शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभांचे आयोजन, उपक्रमांची माहिती लिंकद्वारे भरणे

- ध्वजवंदन, ध्वजसंहिता जागृती : हर घर तिरंगा आढावा, दुपारी शिक्षण परिषद, शिक्षकांना मार्गदर्शन

- हर घर तिरंगा : उपक्रम आढावा, गोषवारा

- आजादी का अमृत महोत्सव : राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे उपक्रम, गाव व शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे, माहिती संकलन करणे, विहित नमुन्यात सादर करणे

- समूह राष्ट्रगान कार्यक्रम

- बँक खाते बदल : गेल्या तीन वर्षांत चौथ्यावेळी बँक खाते बदलाचे आदेश

सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा : २७९७

जिल्हा परिषद शाळेतील मंजूर पदे : ९४०० (उपशिक्षक, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी)

रिक्त पदे : ८३०

अभूतपूर्व कामाचे समाधान

पूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षक भेटल्यावर, माझ्या शाळेतील दहा विद्यार्थांना शिष्यवृत्ती मिळाल्याचे अभिमानाने सांगत असत. परंतु, अलीकडील काळात यात बदल झाला आहे. आता माझे ऑनलाइनचे काम विनाव्यत्यय पूर्ण झाल्याचे समाधान मानतात.