अन्नसुरक्षा अबाधित, बळीराजाला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains farmer crops loss Food grains

अन्नसुरक्षा अबाधित, बळीराजाला फटका

नवी दिल्ली : यंदा मॉन्सूनच्या हंगामात अनियमित पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात किरकोळ घट झाली असली तरीसुद्धा अन्न सुरक्षेवर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही. अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याने महागाई वाढणार नाही, असा दावा कृषी आणि अन्न धोरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. वैयक्तिक पातळीवर मात्र शेतकऱ्यांना अनियमित मॉन्सूनचा मोठा फटका बसला असून अनेकांना अद्याप राज्य सरकारांकडून मदत मिळालेली नाही.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, खरीप हंगामातील तांदळाचे उत्पादन सहा टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. ते गेल्या वर्षीच्या १११ दशलक्ष टनांवरून यावर्षी १०४.९९ दशलक्ष टनांपर्यंत खाली येऊ शकते. मुख्य तांदूळ उत्पादक राज्यांनाही कमी पावसाचा फटका बसला आहे. भाताखालचे एकरी क्षेत्र गतवर्षीच्या ४१.७ दशलक्ष हेक्टरवरून यंदा ३९.९ दशलक्ष हेक्टरपर्यंत खाली घसरले असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते.

भात पिकाला फटका

मॉन्सूनच्या काळात दक्षिण आणि मध्य भारतात अतिरिक्त पाऊस पडला असला तरीसुद्धा पूर्व आणि ईशान्य भारतात पर्जन्यमान तुलनेने कमीच नोंदविल्या गेले आहे, असे ‘स्कायमेट’चे उपाध्यक्ष (हवामानशास्त्र आणि हवामान बदल) महेश पलावत यांनी सांगितले. सिंधू- गंगेच्या खोऱ्यात तुलनेने कमी पाऊस पडल्याने त्याचा मोठा फटका खरिपातील भात पिकाला बसला आहे. यामुळे पूर्व उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातील उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. साधारपणे जून ते ऑगस्टदरम्यानच्या काळात हा फटका बसला. विशेष म्हणजे याच काळामध्ये मध्य भारतात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पर्जन्यमानातील तूट (प्रमाण टक्क्यांत)

राज्य - १५ जुलैपर्यंत - २२ सप्टेंबरपर्यंत

  • बिहार - ४२ - ३०

  • झारखंड - ४९ - २०

  • प.बंगाल - २४ - १५

सोयाबीनला फटका

विलंबाने पाऊस झाल्याने राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उडीद आणि मक्याच्या पिकांना याचा फटका बसला आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास लांबल्याने उत्तरप्रदेशातील मोहरीच्या पेरणीला याचा लाभ होईल असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेशात पातळीपेक्षा ३३ टक्क्यांनी कमी पाऊस झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर ही परिस्थिती फार चिंताजनक आहे असे म्हणता येणार नाही, मोसमाच्या मध्यकाळापासून पर्जन्यवृष्टीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येते. मध्य आणि दक्षिण भारतामध्ये झालेल्या पावसामुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे आम्हाला मिळालेल्या अहवालातून दिसून येते. केंद्र सरकारने आधीच उपाययोजना केल्या असल्याने महागाईची फारशी झळ बसणार नाही.

- विनय सेहगल, ज्येष्ठ संशोधक, भारतीय कृषी संशोधन संस्था

Web Title: Heavy Rains Kharif Crops Loss Farmer Food Grains Security

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..