नॉर्वेतील पालकांना मदतीचे आश्‍वासन

पीटीआय
शनिवार, 24 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली - पालकांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप ठेवत नॉर्वेतील सरकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या आईने या प्रकरणी मदत करण्याच्या विनंतीची दखल भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली असून, संबंधितांना मदत देण्याचे आदेश ओस्लोतील भारतीय राजदूतांना देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे हे प्रकरण नॉर्वेतील अधिकारी अतिशय काळजीपूर्वक आणि संवेदनशीलपणे हाताळत असल्यामुळे पालकांनी संयम बाळगावा, असे नॉर्वेच्या भारतातील दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले.

किरकोळ तक्रारीवरून नॉर्वेतील अधिकाऱ्यांनी आपल्या पाच वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी मदत करण्याची विनंती पालकांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी या प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश ओस्लोतील भारतीय दूतावासाला काल दिला होता. या प्रकरणातील मुलगा आणि त्याचे वडील हे नॉर्वेचे नागरिक असून, मुलाच्या आईकडे भारतीय नागरिकत्व आहे.

स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला असून, मुलाच्या आईच्या विनंतीवरून भारताकडून सर्व मदत पुरविण्यात येईल. स्वराज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिल्लीतील नॉर्वेच्या दूतावासाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे की, पालकांची काळजी आम्ही समजू शकतो. नॉर्वेतील अधिकारी हे प्रकरण अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळत आहेत. त्यामुळे संबंधित मुलाच्या पालकांनी संयम बाळगावा. नॉर्वेतील बालकल्याण कायद्यानुसार हे प्रकरण काटेकोरपणे हाताळले जाईल. नॉर्वेतील सर्व मुलांना हा कायदा लागू होतो. त्यामुळे नागरिकत्व कुठलेही असले तरी संबंधित कायद्यानुसार बालकाच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल.

आत्तापर्यंतची तिसरी घटना
मारहाण किंवा अयोग्य वर्तन केल्याच्या तक्रारीनंतर 2011 मध्ये भारतीय वंशाच्या पालकांच्या मुलांना नॉर्वेतील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. तत्कालीन यूपीए सरकारने नॉर्वेकडे हा विषय उपस्थित केला होता. नॉर्वेतील न्यायालयाने मुलाला पालकांकडे सुपूर्त करण्याचा आदेश दिला होता. 2012 मध्येही असेच प्रकरण समोर आले होते. त्यानंतर संबंधित मुलांना हैदराबादमधील त्यांच्या आजी-आजोबांकडे पाठविण्यात आले होते. नुकताच समोर आलेला हा प्रकार 2011 पासूनची तिसरी घटना आहे.

Web Title: Help will given to norway parents