काचबिंदूच्या नव्या जनुकांवर प्रकाशझोत

Eye
Eye

आंतरराष्ट्रीय संशोधकांकडून ४४ नव्या जनुकांचा शोध; ७.५ कोटी जगभरात काचबिंदू रुग्णांची संख्या
नवी दिल्ली - जगभरात काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. काचबिंदूत अनुवंशिक घटकांची भूमिकाही महत्त्वाची असते. आता, संशोधकांनी काचबिंदूला कारणीभूत ठरणाऱ्या व यापूर्वी माहीत नसलेल्या ४४ जनुकांचा शोध लावला आहे. त्यामुळे, काचबिंदूचा धोका वाढविणाऱ्या एकूण ज्ञात जनुकांची संख्या आता १२७ वर गेली आहे. ऑस्ट्रेलियातील क्युआयएमआर बर्गफोर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या या संशोधनामुळे काचबिंदूचे ज्ञान लक्षणीयरित्या वाढले आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 

बर्गफोर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सांख्यिकीय अनुवंशशास्त्र गटाच्या प्रमुख प्रा. स्टुअर्ट मॅकग्रेगर म्हणाल्या, की या नवीन ४४ जनुकांमुळे काचबिंदूच्या जैविक प्रक्रियेवर तसेच काचबिंदूशी संबंधित प्रतिकारशक्तीवरही नव्याने  प्रकाशझोत पडला आहे.  नवीन बहुतेक जनुके भिन्न वांशिक समुहातील आहेत. काचबिंदूत मानवी डोळ्याची नस (ऑप्टिक नर्व्ह) कमकुवत होते. जगभरात सुमारे साडेसात कोटी जणांना काचबिंदूचा सामना करावा लागत आहे. अटळ अशा अंधत्वाचे ते प्रमुख कारण आहे.

संशोधकांनी जगातील पाच खंडांतील काचबिंदू असलेल्या ३४ हजार रुग्णांच्या अनुवांशिक माहितीची काचबिंदू नसलेल्या साडेतीन लाख लोकांच्या माहितीशी तुलना केली. आशियाई तसेच आफ्रिकी व्यक्तींमध्ये काचबिंदूचे प्रमाण सर्वाधिक आढळले. यापूर्वी युरोपिय वंशांच्या व्यक्तींवर सर्वांत मोठे संशोधन करण्यात आले होते. त्यात, अनुवंशिक चाचण्यांमुळे लवकर उपचार करून कोणाची दृष्टी वाचविता येईल,  हे दर्शविले होते. मात्र, तोकड्या अनुवंशिक माहितीमुळे आम्हाला अनुवंशिक निर्देशक वेगवेगळ्या वंशीयांना लागू होण्याची खात्री नव्हती, असेही संशोधकांनी सांगितले.

संशोधक जॅनी विंग्ज म्हणाले, की सध्या तरी काचबिंदू रोखण्यासाठी कोणताही उपचार नाही. मात्र, सर्व वंशातील लोकांमध्ये काचबिंदूचा धोका ओळखण्यासाठी अनुवंशिक चाचण्यांची मदत होऊ शकते, असे आमचे संशोधन सांगते.    

काचबिंदू हा प्रामुख्याने अनुवंशिक आजार आहे. त्यामुळेच, तो रोखण्यासाठी व त्यावर उपचार करण्याच्या दृष्टिने आम्ही अनुवंशिक घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काचबिंदूची जैविक प्रक्रिया तसेच नेमकी कोणती जनुके तो रोखून भविष्यात औषध तयार करण्यात मदत करतील, हे समजण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत.      
- प्रा. स्टुअर्ट मॅकग्रेगर, 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com