टीना-खान विवाह होऊ नये: हिंदु महासभा

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

टीनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे आम्हाला सर्वांनाच आनंद झाला होता. मात्र खान याच्याशी विवाह करण्याच्या तिच्या निर्णयाचा आम्हाला धक्का बसला असून दु:खही झाले आहे. मुस्लिम हे हिंदु मुलींना प्रेमात पाडतात, त्यांना धर्म बदलावयास लावतात आणि त्यांच्याशी विवाह करतात

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या टीना दाबीने याच परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेल्या अतहर आमीर उल शफी खान याच्याशी विवाह करु नये, यासाठी अखिल भारतीय हिंदु महासभेने टीनाच्या पालकांस पत्र लिहिले आहे. टीनाने खान याच्याशी विवाह करु नये; वा किमान खान याने धर्म तरी बदलावा, असे आवाहन महासभेने या पत्राद्वारे केले आहे.

"तुमच्या कुटूंबाने घेतलेला निर्णय हा लव्ह जिहादला उत्तेजन देणारा आहे. तेव्हा हा विवाह कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ नये. यानंतरही विवाह करावयाची इच्छा असेल; तर आधी खान याची घर वापसी केली जावी. आमचे सदस्य खान याचे धर्मांतर करण्यास मदत करतील,'' असे या संस्थेचे राष्ट्रीय सचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. शर्मा यांनी हे पत्र टीनाचे वडिल जसवंत दाबी यांना लिहिले आहे.

"टीनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे आम्हाला सर्वांनाच आनंद झाला होता. मात्र खान याच्याशी विवाह करण्याच्या तिच्या निर्णयाचा आम्हाला धक्का बसला असून दु:खही झाले आहे. मुस्लिम हे हिंदु मुलींना प्रेमात पाडतात, त्यांना धर्म बदलावयास लावतात आणि त्यांच्याशी विवाह करतात. तरीही हा विवाह त्या दोघांसाठी इतका महत्त्वाचा असेल; तर आधी खान याची घर वापसी केली जावे, असे आमचे आवाहन आहे,'' असे या पत्रात पुढे म्हटले आहे.

नॉर्थ ब्लॉकमध्ये कार्यालयीन कामकाज व प्रशिक्षण विभागाच्या कार्यालयात 11 मे रोजी टीना आणि अतहर यांची पहिली भेट झाली. येथे पहिल्याच नजरेत प्रेम झालं आणि खास सरकारी वातावरणात त्यांचे प्रेम फुलले. 

लग्नाच्या बेडीत अडकण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, मात्र लवकरच साखरपुडा करणार असल्याचे टीनाने माध्यमांशी बोलताना सांगितले. दोघांनी आपल्यातील प्रेम दर्शविणारी छायाचित्रे सोशल मीडियावरही शेअर केली. त्यावर काही लोकांनी टीनावर जातीयवादी टिप्पणी करीत धार्मिक शंका उपस्थित केल्या. मात्र "प्यार किया है, कोई चोरी नही की" अशी भूमिका घेत टीनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तर काहींनी या दोघांचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगत स्वागत केले. 

Web Title: Hindu Mahasabha opposes IAS topper's wedding