हिंदु सेना साजरा करणार ट्रम्प यांचा वाढदिवस

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापेक्षा या वेळचा कार्यक्रम अधिक भव्य असेल. ट्रम्प यांची गेल्या काही वर्षांतील यशस्वी कारकीर्द दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आम्ही या निमित्त भरवित आहोत

नवी दिल्ली - अमेरिकेचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्मदिवस हिंदु सेना ही संघटना साजरा करणार आहे. ट्रम्प हे "मानवतेचे तारणहार' असल्याची या संघटनेची धारणा आहे. ट्रम्प यांचा गेल्या वर्षीचा वाढदिवसही या संघटनेकडून साजरा करण्यात आला होता. ट्रम्प हे उद्या (बुधवार) वयाची 71 वर्षे पूर्ण करणार आहेत.

ट्रम्प यांच्या वाढदिवसानिमित्त जंतर मंतर येथे त्यांच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन हिंदु सेनेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. व्हॉट्‌स ऍप व इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्समधून या प्रदर्शनास येण्याचे आवाहन हिंदु सेनेतर्फे करण्यात आले आहे.

"2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापेक्षा या वेळचा कार्यक्रम अधिक भव्य असेल. ट्रम्प यांची गेल्या काही वर्षांतील यशस्वी कारकीर्द दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आम्ही या निमित्त भरवित आहोत,'' असे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.

Web Title: Hindu Sena celebrates Trump's Birthday