Loksabha 2019 : निर्वासितांवर भाजपकडून हिंदुत्वाचे जाळे 

शनिवार, 4 मे 2019

पाचवा टप्पा निर्णायक 
पश्‍चिम बंगालमधील लोकसभा निवडणूक सर्व सात टप्प्यांत असली, अन्‌ 42 पैकी 24 मतदारसंघ शेवटच्या तीन टप्प्यांत येत असले तरी धार्मिक डावपेचाचा भाग म्हणून मतुआ या मागास समाजावर टाकण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या जाळ्यासाठी पाचवा टप्पा निर्णायक असेल. ठाकूरवाडीचा बनगाव, तसेच बराकपूर, हावडा, उलुबेरिया, हुगळी, आरामबाग आणि श्रीरामपूर सात मतदारसंघांमध्ये 6 मे रोजी मतदान होईल.

कोलकता : सध्या देशाला चिंतेत टाकणाऱ्या नक्षलवादी चळवळीची माहिती साऱ्या देशासह जगाला आहे. तितकी माहिती मात्र एकत्रित बंगालमधील वैचारिक आणि धार्मिक क्रांतीचे उगमस्थान असलेल्या ठाकूरबाडीची नाही. अर्थात, भारतीय जनता पक्षाच्या चाणक्‍यांनी ही बाब हेरली नसती तरच नवल. बांगलादेशला सीमावर्ती असलेल्या बनगाव लोकसभा मतदारसंघानिमित्ताने भाजपने मतुआ संप्रदायाच्या रूपाने ठाकूरबाडीभोवती यशाची समीकरणे गुंफलीत. थोर धर्मसुधारक हरिचंद ठाकूर यांच्या कुटुंबातील काकी आणि पुतण्याच्या लढाईनिमित्ताने भाजपने जे डावपेच खेळलेत, त्यांचे भवितव्य 6 मे रोजी मतदान यंत्रांमध्ये बंद होईल. 

उत्तर भारतातल्या हिंदी भाषिक पट्ट्यातून घटणाऱ्या जागांची भरपाई बंगालमधून करण्याची भाजपची खेळी आहे. त्यासाठी बंगालमध्ये लढवलेले डावपेच लक्षवेधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालवारीची सुरवात ज्या ठाकूरनगरमधून केली, तिथले धार्मिक, सामाजिक व राजकीय संदर्भ हा निवडणुकीच्या राजकारणाचा वस्तूपाठ ठरावा. त्या सभेपूर्वी मतुआ संप्रदायाच्या प्रमुख बडी मॉं वीणापाणी देवी यांचे त्यांनी दर्शन घेतले. हा संप्रदाय बंगालमधील प्रमुख राजकीय ताकद आहे. या समाजानेच 1977 मध्ये कॉंग्रेसची सत्ता उलथवून टाकली अन्‌ 34 वर्षांनंतर डाव्यांऐवजी ममतांची तृणमूल कॉंगेस सत्तेवर आणण्यातही मतुआंचीच मुख्य भूमिका होती, असे मानले जाते. 

मोदींनी दर्शन घेण्याआधी काही दिवस शंभरीवरील बडी मॉं वीणामाणी देवी यांना ममता सरकारने "बंग विभूषण' या सर्वोच्च सन्मानाने गौरवले होते. बडी मॉं यांची थोरली सून ममता बाला ठाकूर चार वर्षांपूर्वी बनगावच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. त्या आधी ती जागा बडी मॉंचे थोरले पुत्र कपिल कृष्ण ठाकूर यांनी जिंकली होती. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेतली. देशातल्या अन्य बड्या घराण्यांप्रमाणे याही घराण्यात भाजपने स्थान मिळवले. ममताबालीच्या विरोधात त्यांच्या पुतण्या, बडी मॉंचे दुसरे पुत्र मंजूल कृष्ण ठाकूर यांचा मुलगा सुब्रत यांनी पोटनिवडणूक लढविली. पण, ते दोन लाखांवर मतांनी पराभूत झाले. 

सतराव्या लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या पाच दिवस आधी, 5 मार्च रोजी बडी मॉं यांचे (वय 101) निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार सरकारी इतमामात झाले. मतुआ महासंघाने त्यांच्या तात्पुरत्या उत्तराधिकारी म्हणून ममता बालांना नियुक्त केले. पण, ही बाब त्यांच्याविरुद्ध भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरलेले पुतणे शांतनू ठाकूर यांना मान्य नाही. थोडक्‍यात, मतुआ समाज केवळ बनगावचा खासदार नव्हे, तर राजकीय दृष्ट्या प्रभावी ठाकूर घराण्याचा वारसदार निवडणार आहे आणि त्यांचा फैसला कदाचित बंगालचे राजकीय चित्र नव्याने रेखाटू शकतो. 

ठाकूर घराण्याला राजकारण नवे नाही. बडी यांचे पती आणि ममता ठाकूर यांचे सासरे प्रभात रंजन ठाकूर यांच्या 1962 च्या आमदारकीपासून ती परंपरा आहे. मतुआ संप्रदायाचा लोकसभेच्या किमान सात, तर विधानसभेच्या 74 जागांवर प्रभाव आहे. दीड कोटी लोकसंख्येचा समाज गेली आठ-नऊ वर्षे ममतांच्या पाठीशी आहे. सध्या तरी ती साथ सुटणार नाही, असे अभ्यासकांना वाटते. 

आर्थिक विचारांचा तिढा 
भाजपने मतुआ संप्रदायावर जाळे टाकताना हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संप्रदायाच्या प्रमुखांना कुंभस्नानाचे निमंत्रण दिले. परंतु, ते स्वीकारले गेले नाही. कारण, मुळात मतुआ हा नामशुद्र चळवळीतून उदयास आलेला संप्रदाय आहे. मतुआ, माळी, तेली वगैरे जाती बंगालमध्ये चांडाळ समजल्या जात. श्री श्री हरिचंद ठाकूर, त्यांचे पुत्र गुरूचंद ठाकूर यांनी वैदिक धर्माविरोधात भूमिका घेतली. "द्वादश साशिती' नावाचे अनुयायांना मार्गदर्शनाचे सूत्र आणले. बंगालमधील सामाजिक-धार्मिक चळवळीतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. मुख्यत्वे हा समाज स्वातंत्र्यापूर्वीच्या एकत्रित बांगलादेशात प्रभावी होती. फाळणीनंतर ज्या हिंदू मागास जाती भारतात स्थलांतरीत झाल्या त्यात मतुआ प्रमुख होते. सीमेपलीकडून अजूनही येणे-जाणे सुरूच आहे. अशा वेळी भाजपने "सिटिझनशिप अमेंडमेंट बिल' आणि "एनआरसी'च्या रूपाने निसंदिग्ध भारतीय नागरिकत्वाचे आश्‍वासन पुढे केलंय. नागरिकत्वाचा नवा कायदा आल्यानंतर मुस्लिम सोडून अन्य धर्मियांना नागरिकत्व दिले जाईल, याचा पुनरुच्चार भाजपचे अध्यक्ष अमित शहा करीत आहेत. 

पाचवा टप्पा निर्णायक 
पश्‍चिम बंगालमधील लोकसभा निवडणूक सर्व सात टप्प्यांत असली, अन्‌ 42 पैकी 24 मतदारसंघ शेवटच्या तीन टप्प्यांत येत असले तरी धार्मिक डावपेचाचा भाग म्हणून मतुआ या मागास समाजावर टाकण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या जाळ्यासाठी पाचवा टप्पा निर्णायक असेल. ठाकूरवाडीचा बनगाव, तसेच बराकपूर, हावडा, उलुबेरिया, हुगळी, आरामबाग आणि श्रीरामपूर सात मतदारसंघांमध्ये 6 मे रोजी मतदान होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindutva is main agenda for BJP campaigning in West Bengal