आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात; 41 जण ठार

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

आंध्र प्रदेश-ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या कुनेरु स्थानकाजवळ शनिवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. जगदलपूर-भुवनेश्वर या हिराखंड एक्सप्रेसचे इंजिन व 7 डबे रुळावरुन घसरले.

कुनेरु (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशातील विझियानांगरम जिल्ह्यातील कुनेरु येथे जगदलपूर-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 41 जण ठार झाले असून, 50 हून अधिकजण जखमी आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

आंध्र प्रदेश-ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या कुनेरु स्थानकाजवळ शनिवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. जगदलपूर-भुवनेश्वर या हिराखंड एक्सप्रेसचे इंजिन व 7 डबे रुळावरुन घसरले. जगदलपूरहून भुवनेश्वरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

या अपघातात आतापर्यंत 41 जण ठार झाले असून, 50 हून अधिकजण जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. घसरलेले डबे हटविण्याचे काम सुरु आहे. 

केंद्रीय रेल्वेमंत्रालयातील संबंधिक अधिकारी आणि स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे या सर्व घटनेवर लक्ष ठेवून आहेत. कुनेरु हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात आहे का, हे तपासण्यात येत आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विझियानांगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सर्वोतोपरी मदत पुरविण्यात येत आहे, असे नायडू यांनी सांगितले.

Web Title: Hirakhand Express Accident: 41 Dead as Odisha-bound Train Derails in AP