
Baba Kalyani : कोट्यवधीच्या कंपनीचे मालक पण भावा बहिणीचा वाद सुटेना! भारत फोर्जचे बाबा कल्याणी अडचणीत
भारतामध्ये भावकीतली भांडणं, प्रॉपर्टीसाठी होणारे वाद हे काही नवीन नाही. असाच एक वाद भारतातल्या एका मोठ्या कॉर्पोरेट घराण्यामध्येही सुरू झाला आहे. भाऊ आणि बहिणीतला हा वाद असून त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर हा वाद सुरू झाला आहे.
बहिणीचा आरोप आहे की आईच्या मृत्यूनंतर भावाने तिच्या हक्कावर गदा आणली आहे. हा वाद आहे ३६५०० कोटींची कंपनी भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी आणि त्यांची बहीण सुगंधा हिरेमठ यांच्यातला. सुगंधा यांनी बाबा कल्याणींवर आरोप केला आहे की, आपल्या आईच्या मृत्यूनंतर मालमत्तेतला जो वाटा मिळायला हवा होता तो त्यांचा भाऊ बाबा कल्याणीने दिलेला नाही. उलट तो हडप करण्याचा प्रयत्न केला आहे.
कल्याणी यांनी मात्र आपल्या बहिणीचे हे आरोप नाकारले आहेत. पण आता हा वाद अधिक चिघळत चालला आहे. हे प्रकरण सुगंधा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात नेलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा वाद फेब्रुवारी २०२३ च्या नंतर सुरू झाला आहे. बाबा कल्याणी आणि सुगंधा हिरेमठ यांच्या आईचं २५ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर सुगंधा यांनी आरोप केला की ११९४ मध्ये ठरल्याप्रमाणे कल्याणी यांनी सगळा वाटा आपल्याला देणं भाग होतं.
पण या ऐवजी त्यांनी स्वतःचा वाटा वाढवला आणि ते आता सुगंधा आणि त्यांच्या पतीला हीकल या कंपनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले आहे. हीकल कंपनी साधारण ३५०० कोटी रुपयांची आहे. हीकल कंपनीमध्ये सुगंधा हिरेमठ ३५ टक्के आणि कल्याणी ३४ टक्क्यांचे पार्टनर आहेत. सुगंधा यांचं म्हणणं आहे की, कल्याणी यांनी आता कंपनीचे ५८ लाख अधिक शेअर्स खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
याअंतर्गत बाबा कल्याणी यांना १५८ कोटी रुपये द्यावे लागतील. कल्याणी आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सुगंधा यांनी केला आहे.
ताज महाल हॉटेलमध्ये झाली होती चर्चा
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, १९ जून १९९४ मध्ये मुंबईच्या ताजमहल हॉटेलमध्ये या दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानुसार हीकलचे शेअर्स सुगंधा यांच्याकडे द्यायला हवे होते. ही चर्चा जयदेव हिरेमठ, सुगंधांची आई, भाऊ कल्याणी आणि ICICI बँकेचे तत्कालिन चेअरमन एन वघुल आणि सेबीचे माजी अध्यक्ष एस एस नाड़कर्णी यांच्यात झाली होती.