कर्नाटकात कुमारस्वामींच्या शपथविधीवेळी शक्तिप्रदर्शन

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व "जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला. 

बंगळूर - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व "जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला. 

माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी सर्वांना एकत्र आणण्यासाठी मोठी ताकद लावली. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव आदींनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. या सोहळ्यातून भाजपविरोधातील मोट बांधण्याची तयारी गतीने सुरू झाली. 

देशातील सर्वच विरोधी नेत्यांच्या चेहऱ्यांवर आजच्या सोहळ्यात उत्साह दिसला. सर्व नेते हातात हात घेऊन छायाचित्रासाठी पोझ देताना दिसले. कुमारस्वामींचा आजचा शपथविधी सोहळा म्हणजे तिसऱ्या आघाडीचे बळ वाढवण्यासाठी एक मेगा इव्हेंटच ठरला. 

शुक्रवारी बहुमत चाचणी 

कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जे. परमेश्‍वर यांनी शपथ घेतली. विधानसौधसमोर सायंकाळी 4.30 वाजता राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ देवविली. सुमारे एक लाखाहून अधिक लोक या वेळी उपस्थित होते. हे सरकार शुक्रवारी (ता. 25) बहुमत सिद्ध करणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

Web Title: Historic To See So Many Leaders Come Together, Says HD Kumaraswamy On Oath Ceremony