महिला वैमानिकांनी रचला इतिहास;सॅनफ्रान्सिस्को- बंगळूर विमान प्रवास १७ तासांत

air india
air india

बंगळूर - एअर इंडियाच्या चार महिला वैमानिकांच्या चमूने सोमवारी सर्वात लांबच्या हवाई मार्गावरून व उत्तर ध्रुवावरून प्रथमच उड्डाण करून सोमवारी इतिहास निर्माण केला. एअर इंडियाच्या ‘एआय १७६’ या बोईंग विमानाने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोच्या विमानतळावरून रविवारी (ता.११) उड्डाण केले. उत्तर ध्रुवामार्गे सुमारे १६ हजार किलोमीटर अंतर पार करीत हे विमान आज सकाळी बंगळूरमधील केम्पोगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले.

सॅनफ्रान्सिस्को- बंगळूर या मार्गावरील एअर इंडियाच्या या उद्‍घाटनपर विमानाचे सारथ्य कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी थनमई, कॅप्टन शिवानी मन्हास आणि कॅप्टन आकांक्षा सोनावणे या चार महिला वैमानिकांनी केले. कॅप्टन झोया यांच्याकडे या चमूचे नेतृत्व होते. विमान भारतीय भूमीत उतरल्यानंतर लगेचच एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्वागत केले. ‘‘वेलकम होम, सर्व महिला वैमानिकांचा आम्हाला अभिमान आहे. या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या ‘एआय १७६’ या विमानातील सर्व प्रवाशांचेही आम्ही अभिनंदन करतो,’’ असे ट्विट एअर इंडियाने केले.

बंगळूर विमानतळावर यशस्वीपणे विमान उतरल्यानंतर झोया अग्रवाल यांनी आनंद व्यक्त केला. ‘‘आज आम्ही उत्तर ध्रुवावरून उड्डाण तर केलेच शिवाय केवळ महिला वैमानिकांद्वारे ते यशस्वी करून जागतिक इतिहास रचला आहे. आम्ही या घटनेचा हिस्सा असल्याने आम्हाला खूप आनंद व अभिमान वाटत आहे. या मार्गावरुन उड्डाण केल्याने दहा टन इंधन बचत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

उड्डाणाचे महत्त्व...
  अमेरिकेच्या पश्‍चिम किनारी भाग आणि दक्षिण भारत यांच्या दरम्यान पहिलेच थेट विमान.
  सॅनफ्रान्सिस्कोवरुन भरारी घेतल्यानंतर त्याच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती एअर इंडियाच्या ट्विटर हँडवर.
  नागरी विमान उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनीही ट्विट करीत महिला वैमानिकांच्या या ऐतिहासिक प्रवासामुळेच वंदे भारत मोहिमेचे महत्त्व अधोरेखित होत आहे, असे सांगितले.
  एअर इंडियाच्या वैमानिकांनी यापूर्वीही ध्रुवीय मार्गावरून उड्डाण केले आहे, पण सर्व महिला वैमानिक असलेल्या विमानाने उत्तर ध्रुवावरुन उड्डाण केल्याची घटना प्रथमच घडली.

मुंबईकर आकांक्षा  
मुंबईकर असलेल्या आकांक्षा सोनावणे यांनी सिडनहॅम महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये विमानोड्डाणाचे धडे गिरवले. त्यांची मोठी बहीण तेजल याही एअर इंडियामध्ये कॅप्टन आहेत. सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता यावले यांनी आकांक्षाच्या भरारीचे कौतुक करताना सर्वांनाच तिचा अभिमान वाटतो आहे, असे सांगितले 

हा अत्यंत रोमांचकारी अनुभव होता. असे आधी कधीच झाले नव्हते. येथे पोचण्यासाठी साधारण १७ तास वेळ लागला.
- शिवानी, वैमानिक

कॉकपिटमध्ये सर्व महिला वैमानिक - भारतात येणारे दीर्घ पल्ल्याचे विमान- उत्तर ध्रुवावरून प्रवास याची कल्पना करा आणि हे सर्व झाले आहे. विक्रम मोडले. ‘एआय- १७६’ ने इतिहास रचला. हे विमान ३० हजार फूट उंचावरून उडाले.
- एअर इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com