उमर फयाजच्या हत्येमागे 'लष्करे', 'हिज्बुल'चा हात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

कुलगाममध्ये राहणाऱ्या लेफ्टनंट उमर फयाजचा मृतदेह बुधवारी सकाळी शोपियॉंमध्ये आढळून आला होता. उमर फयाजचे मंगळवारी राहत्या घरातूनच अपहरण करण्यात आले होते.

नवी दिल्ली / श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील लेफ्टनंट उमर फयाजच्या हत्येमागे लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात होता. तसेच किमान सहा दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली, अशी माहिती संरक्षण दलांतील सूत्रांनी दिली. फयाजच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या रायफलमधील काडतुसांच्या आधारे शोध सुरू करण्यात आला आहे.

जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक जावेद गिलानी म्हणाले, ''आम्ही घटनास्थळावरून इन्सास रायफलमधील काडतुसे जप्त केली आहेत. काही दिवसांपूर्वी जम्मूत पोलिसांकडील इन्सास रायफल हिसकावून दहशतवाद्यांनी पळ काढला होता. याच रायफलचा वापर उमर फयाजच्या हत्येसाठी करण्यात आला का याची तपासणी सुरू आहे.''

गिलानी म्हणाले, ''या घटनेत हिजबल मुजाहिदीन मॉड्यूलचा हात दिसत आहे. आम्ही दहशतवाद्यांची ओळख पटवली असून त्यांची नावे तूर्तास जाहीर करणार नाही," शवविच्छेदन अहवाल अजून उपलब्ध झालेला नाही. पण प्राथमिक माहितीनुसार उमर फयाजच्या अंगावर अत्याचाराच्या खुणा दिसलेल्या नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

कुलगाममध्ये राहणाऱ्या लेफ्टनंट उमर फयाजचा मृतदेह बुधवारी सकाळी शोपियॉंमध्ये आढळून आला होता. उमर फयाजचे मंगळवारी राहत्या घरातूनच अपहरण करण्यात आले होते. फयाजवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तो वर्षभरापूर्वीच सैन्यात भरती झाला होता. पहिल्यांदाच रजा घेऊन आलेल्या उमर फयाजची ही रजा शेवटची ठरली.

Web Title: hizbul, lashkar e taiba behind Lt umar fayyaz murder