हिज्बुलचे पाच दहशतवादी ठार 

पीटीआय
सोमवार, 7 मे 2018

सुरक्षा दलाची "ऑल आउट मोहीम; मृतातील दहशतवादी निघाला सहायक प्राध्यापक 

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलाला आज मोठे यश मिळाले. शोपियॉं येथील चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे पाच दहशतवादी ठार केले. त्यात हिज्बुलच्या कमांडरसह दहशतवादी संघटनेत नव्याने भरती झालेल्या काश्‍मीर विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापकाचा समावेश आहे. मोहंमद रफी भट असे त्या प्राध्यापकाचे नाव असून, तो शुक्रवारपासून बेपत्ता होता. शोपियॉंच्या बडीगाम आणि झैनपुरा येथे चकमक झाली. पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. मृतांत हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर सद्दाम पड्डरचा समावेश असल्याचे जम्मू-काश्‍मीर पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. दरम्यान, सुरक्षा दल आणि नागरिक यांच्यातील धुमश्‍चक्रीत जखमी झालेल्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला. 

श्रीनगर शहराजवळ तीन दहशतवाद्यांना ठार करून चोवीस तासही उलटत नाहीत तोच शोपियॉंत सुरक्षा दलाने मोठी कामगिरी बजावली. सुरक्षा दलाला झैनपुरातील बडीगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तपास मोहीम सुरू करण्यात आली. तपासादरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने जोरदार कारवाई करत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला. अन्य तीन दहशतवाद्यांची नावे तौसिफ शेख, आदिल मलिक आणि बिलाल ऊर्फ मौलवी अशी आहेत. हे सर्व दहशतवादी काश्‍मीरचे रहिवासी होत. हे पाचही दहशतवादी मृत दहशतवादी बुऱ्हाण वणीचे समर्थक होते. सुरक्षा दलाच्या ऑल आउट मोहिमेंतर्गत बडीगाम येथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात आला. 

बेपत्ता प्राध्यापक बनला दहशतवादी 

दहशतवादी मोहंमद रफी भट हा काश्‍मीर विद्यापीठात समाजशास्त्र विभागात कंत्राट तत्त्वावर सहायक प्राध्यापक म्हणून काम करत होता. तो गंधरबल जिल्ह्यातील चौदिना येथील रहिवासी होता. तो शुक्रवारपासून गायब होता. तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. या गोळीबारात दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाहित्य सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

नागरिकांची दगडफेक 

दरम्यान, चकमकीच्या ठिकाणी नागरिकांनी दगडफेक करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. शोपियॉं, पुलवामा आणि दक्षिण काश्‍मीरातील अन्य भागात सुरक्षा दलावर नागरिकांनी दगडफेक केली. यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत अनेक नागरिक जखमी झाले. जखमींना दवाखान्यात नेले. त्यापैकी पाच जखमींचे निधन झाले. तसेच दहशतवादी भटच्या मृत्युच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काश्‍मीर विद्यापीठ दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असून सोमवारी होणारी परीक्षादेखील पुढे ढकलली आहे. दक्षिण काश्‍मीरातील जिल्हे आणि गंदरबल येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. श्रीनगरमध्येदेखील सलग दुसऱ्या दिवशीही इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. 
 

Web Title: Hizbuls five terrorists killed