esakal | कोरोनाचं रौद्ररुप: देशात पुन्हा लागणार का लॉकडाऊन? अमित शहांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

देशात पुन्हा लागणार का लॉकडाऊन? अमित शहांनी दिलं स्पष्टीकरण

देशात पुन्हा लागणार का लॉकडाऊन? अमित शहांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. देशात आतापर्यंत सर्वाधिक दैनंदिन आकडेवारी दोन लाखांच्या पार गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची रुग्णसंख्या 2.60 लाखांच्या पार गेली आहे. देशातील 12 राज्यांची स्थिती अत्यंत खराब अवस्थेत आहे. यामधील महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक बाधित राज्य बनलं आहे. महाराष्ट्र राज्यात 60 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

तर दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. या राज्यात देखील 27 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीमध्ये देखील 19 हजारहून अधिक रुग्णसंख्या आढळली आहे. राज्या-राज्यांमधील या बिघडत्या स्थितीमुळे अनेक राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्या त्या राज्यांच्या परिस्थितीनुसार या लॉकडाऊनच्या नियमांची आखणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये रविवारी संपूर्ण बंदी आहे. तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची ही भयावह परिस्थिती पाहता संपूर्ण देशातच पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येईल, अशी शक्यता वाटत आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, सध्यातरी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावला जावा, अशी परिस्थिती दिसत नाहीये. देशामध्ये गडबडीमध्ये लॉकडाऊन लावला जाऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

केंद्र राज्यांच्या सातत्याने संपर्कात

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लॉकडाऊनबाबतची केंद्र सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण लॉकडाऊन करणं आता गडबडीचं होईल. त्यांनी पुढे म्हटलं की, मागच्या वर्षी लॉकडाऊन लावण्याचा उद्देश वेगळा होता. त्यावेळी देशात औषध अथवा लस नव्हती. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही राज्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत. राज्यांचा जो निर्णय असेल आम्ही त्यासोबत आहोत.

कोरोनाचा नवा म्यूटंट चिंताजनक

कोरोनाच्या नवा म्यूटंट आपल्याला किती धोकादायक वाटतो, या प्रश्नावर अमित शहा यांनी उत्तर देताना म्हटलं की, याबाबत प्रत्येकजण चिंतीत आहे. मला देखील याची चिंता वाटते. मात्र, आपले वैज्ञानिक या नव्या म्युटंटशी लढण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करत आहेत. मला विश्वास आहे की आपण जरुर जिंकू.