नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी 'समाधान' 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

अशी आहे अष्टसूत्री 
'समाधान' या अष्टसूत्रीचा राजनाथसिंह यांनी सांगितलेला विस्तार असा:
कल्पक नेतृत्व, आक्रमक मोहीम आखणी, प्रोत्साहन-प्रशिक्षण, सक्षम गुप्तचर यंत्रणा, 'की परफॉर्मन्स इंडिकेटर्स', प्रत्येक संभाव्य धोक्‍यासाठी वेगळा धडक कृती कार्यक्रम, तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर, नक्षलवाद्यांच्या आर्थिक वाटा बंद करणे.

नवी दिल्ली : वारंवार डोके वर काढणाऱ्या डाव्या विचारांच्या अतिरेकीवादाचे म्हणजेच माओवाद वा नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यासाठी या नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या कसून आवळण्याची आत्यंतिक गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले.

सुकमातील नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत बोलावण्यात आलेल्या महाराष्ट्रासह दहा नक्षलवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राजनाथसिंह यांनी नक्षलवादाच्या बीमोडासाठी 'समाधान'नामक अष्टसूत्री राबवावी, अशीही आग्रही सूचना या राज्यांना केली. 

छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगली भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे 25 जवान हुतात्मा झाले. या पार्श्‍वभूमीवर नक्षलवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री, पोलिसप्रमुख व मुख्य सचिवांची ही बैठक येथील विज्ञान भवनात आज झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची सूचना करताना गृहमंत्र्यांचा रोख या हिंसाचारी गटांना रसद पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, परकीय मदत संस्था यांच्याकडे असणार हे उघड आहे. 

सुकमा हल्ल्यात 25 जवानांच्या हौतात्म्यामुळे सारा देश शोकसंतप्त झाल्याचे सांगून राजनाथसिंह म्हणाले, की नक्षलवाद्यांचा कायमचा बीमोड करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती व संघटित कार्यवाही व समन्वित प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. देशाच्या लोकशाहीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांनी व त्यांच्या कर्त्याधर्त्यांनी अनेकदा केले; पण त्यात त्यांना कधी यश आले नाही वा येणारही नाही. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी लघु-मध्यम व दीर्घकालीन कृती मोहीम स्पष्टपणे आखावी व तडीस न्यावी, असे ते म्हणाले. 

निमलष्करी जवानांना ज्या परिस्थितीत नक्षलवादाचा सामना करावा लागतो ते पाहता या जवानांच्या सोयीसुविधांकडेही आवर्जून लक्ष पुरवले पाहिजे, असे सांगून राजनाथसिंह म्हणाले, की या जवानांचे प्रशिक्षण व त्यांच्या सुविधा यांच्याकडे काळजीपूर्वक व सातत्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या निवासी छावण्यांत विजेचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा ठेवावा. त्यांच्या रजा व सुट्या यांचीही पुरेशी काळजी घ्यावी, असेही त्यांनी सूचकपणे सांगितले. जिवावर उदार होऊन नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या सुरक्षा दलांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, प्रत्येक गस्ती पथकासाठी व तुकडीसाठी वेगळे मानवरहित टेहळणी वाहन (यूएव्ही) आवर्जून सोबत ठेवणे, परिस्थितीचा वारंवार व सर्वंकष आढावा घेणे आदी सूचनाही राजनाथसिंह यांनी केल्या. 

Web Title: Home Minister Rajnath Singh to introduce new mission to tackle Naxalites