गृहमंत्र्यांकडून केरळची हवाई पाहणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई पाहणी केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्याला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. राज्यांत पुरामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 37 वर पोचली आहे. केरळ सरकारने आज केंद्राकडे 1 हजार 220 कोटी रुपयांचा मदतनिधी मागितला. या पुरामुळे राज्याचे 8 हजार 316 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. 

कोची: केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई पाहणी केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्याला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. राज्यांत पुरामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 37 वर पोचली आहे. केरळ सरकारने आज केंद्राकडे 1 हजार 220 कोटी रुपयांचा मदतनिधी मागितला. या पुरामुळे राज्याचे 8 हजार 316 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, शनिवारी केरळला अतिवृष्टीपासून काहीसा दिलासा मिळाला. मुख्य धरणांतील पाण्याची पातळी खालावली असली तरीसुद्धा राज्यातील हायअलर्ट कायम आहे. चार जिल्ह्यांतील साठ हजार लोकांना पुनर्वसन छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये इडुक्की, एर्नाकुलम, पलक्कड, वायनाड, मलप्पुरम, कोझीकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राजनाथसिंह यांनी आज पारावूरजवळील एलनाथीक्कराजवळील पुनर्वसन छावणीला भेट दिली. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पूरस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. या पुरामुळे उद्‌ध्वस्त झालेली घरे पुन्हा एकदा राहण्यायोग्य बनविण्यात येतील, असे आश्‍वासनही राजनाथसिंह यांनी दिले. 

चेन्नीथाला यांची मागणी 
विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी केंद्राने तातडीने केरळला अतिरिक्त मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. राज्याला चार हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज दिले जावे, असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत केरळ मदत देण्याची विनंती केली होती. 

Web Title: Home Minister Rajnath Singh to visit flood affected Kerala