मुखाच्या कर्करोगावर मधाचे रामबाण औषध

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

कोलकाता : अनेक वर्षांच्या संशोधनानंतर भारतीय संशोधकांच्या समूहाने मुखाच्या कर्करोगावर रामबाण उपाय ठरणारा मधाचा औषधी फॉर्म्युला शोधून काढला आहे. "आयआयटी खडगपूर'मधील एका आंतरविद्याशाखीय संशोधन गटामध्ये रसायन अभियंते, जैवतंत्रज्ञ आणि डॉक्‍टर सहभागी झाले होते.

कोलकाता : अनेक वर्षांच्या संशोधनानंतर भारतीय संशोधकांच्या समूहाने मुखाच्या कर्करोगावर रामबाण उपाय ठरणारा मधाचा औषधी फॉर्म्युला शोधून काढला आहे. "आयआयटी खडगपूर'मधील एका आंतरविद्याशाखीय संशोधन गटामध्ये रसायन अभियंते, जैवतंत्रज्ञ आणि डॉक्‍टर सहभागी झाले होते.

संशोधकांनी मध आणि रेशमाचा वापर करून एक पट्टी तयार केली असून, ती बॅंडेजसारखी घशावर लावता येईल. या पट्टीमुळे कर्करोगाची जखम बरी तर होतेच; पण त्याचबरोबर शस्त्रक्रियेनंतर होणारा कर्करोगाचा प्रसारदेखील थांबतो, असे संशोधानाअंती स्पष्ट झाले आहे. "आयआयटी'मधील मेडिकल सायन्स आणि टेक्‍नोलॉजीच्या प्रयोगशाळेत याबाबत सविस्तर संशोधन करण्यात आले होते.

मधात कर्करोग रोखणारे असंख्य घटक असून, ते विषाणूंचा नायनाट करत असल्याचेही प्रयोगाअंती स्पष्ट झाले आहे, असे संशोधिका मोनिका राजपूत यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले. "सॉफ्ट नॅनो टेक्‍नोलॉजी' संकल्पनेचा विस्तार आयआयटी खडगपूरमधील प्राध्यापक रविव्रत मुखर्जी यांनी केला, तर याची मूळ संकल्पना ज्योतिर्मय चॅटर्जी यांनी मांडली होती.

पेटंट मिळवले
संशोधकांनी यासाठी पेटंट मिळवले असून, हे संशोधन "इंटरनॅशनल जर्नल ऑफ दि अमेरिकन केमिकल सोसायटी'च्या "एसीएस बायोमटेरिअल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बाजारामध्ये आणण्यासाठी संशोधक त्याची आधी प्राण्यांवर चाचणी घेतील आणि नंतर त्याचा माणसांवर प्रयोग केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लवचिक शीट
संशोधकांनी तयार केलेली मेम्बरेन शीट ही रेशमाचा धाग्यांचा वापर करून तयार करण्यात आली असून, ती लवचिक तर आहेच; पण त्याचबरोबर ती मानवी शरीराशी जैविक पद्धतीने जोडून घेऊ शकते. या मेम्बरेन शीटसाठी केवळ रेशीम आणि मधाचा वापर करण्यात आला असल्याने सर्व रुग्णांना या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल. व्यावसायिक स्तरावर या शीटचे उत्पादन सुरू झाल्यानंतर औषध कंपन्या त्यांची विक्री करतील.
 

Web Title: honey is a remedy on mouth cancer