Chandrayaan 2 : हा तिरंग्याचा सन्मान : के. सिवन

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

चांद्रयान-2 15 जुलैला अवकाशात झेपावणार होते, पण तांत्रिक अडचणीमुळे ही मोहिम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मागचा आठवडाभर अविश्रांत मेहनत घेणाऱ्या शास्त्रज्ञांना सिवन यांनी सलाम केला आहे.

श्रीहरिकोटा : भारताच्या जिरेटोपात आणखी एक मानाचा तुरा खोवणारा सुवर्णक्षण आज सर्व भारतीयांनीच नव्हे, तर जगभरातील अनेक अंतराळप्रेमींनी आपल्या डोळ्यांत साठवला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गेल्या आठवड्यात तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहिम स्थगित केली होती. ही चांद्रयान-2 मोहिम आज यशस्वी करून दाखविल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

"चांद्रयान-2 मोहिमेची यशस्वी सुरूवात झाली आहे. आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्राहून चांद्रयान-2 अवकाशात झेपावले. जीएसएलव्हीएमके3-एम1 प्रक्षेपकाने चांद्रयान-2 ला पृथ्वीच्या कक्षेत सोडल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारताच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे. यावर्षी अनेक मोहिमा आहेत. त्यामुळे आता पुढच्या मोहिमेवर काम सुरू करणार आहोत. ही मोहिम यशस्वी करण्यात ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांना माझा सलाम!,'' अशा शब्दांत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी या मोहिमेचे वर्णन केले.

दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी 'बाहुबली' नावाचे रॉकेट चांद्रयानाला घेऊन अवकाशात झेपावले. पुढच्या काही मिनिटांत या यानाने पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर इस्रो प्रमुख के. सिवन यांनी उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली. 'चांद्रयान-2'चे यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आता पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करणार असल्याचे सिवन यांनी जाहीर केले.

चांद्रयान-2 15 जुलैला अवकाशात झेपावणार होते, पण तांत्रिक अडचणीमुळे ही मोहिम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मागचा आठवडाभर अविश्रांत मेहनत घेणाऱ्या शास्त्रज्ञांना सिवन यांनी सलाम केला आहे. उड्डाणानंतर 48 दिवसांनी चांद्रयान-2 मधील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is honor of India says K. Sivan