
Crime News : दाढी, टॅटू, तुटलेलं बोट...; अखेर १४ वर्षांनंतर अशी उलगडली 'मर्डर मिस्ट्री'
मजुराचा खून करणाऱ्या संदीप नावाच्या तरुणाला गुन्ह्याच्या १४ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर हे प्रकरण किती थरारक होतं, याचा खुलासा झाला आहे. दाढी वाढवून फरार झालेला हा आरोपी १४ वर्षांनंतर कसा काय सापडला? जाणून घ्या...
नक्की काय घडलं?
१३ आणि १४ नोव्हेंबर २००९ रोजी चार आरोपींनी अल्लाह नूर या २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली. दिल्लीतल्या ख्याला इथं ही घटना घडली. या खुनाच्या गुन्ह्याची नोंद टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. त्यानंतर तपासासाठी पोलिसांची एक टीमही तयार झाली.
त्यानंतर या प्रकरणातल्या चार आरोपींपैकी तीन, सनी, राहुल आणि संजय यांना अटकही करण्यात आली. मात्र संदीप फरार झाला. तो काही केल्या सापडत नव्हता. बिहार आणि झारखंडला पळून जाण्याआधी तो काही काळ लपून बसला होता. तिकडे गेल्यानंतर तो बांधकाम मजूर म्हणून काम करू लागला. झारखंडमधल्या एका राधा नामक तरुणीशी त्याने लग्नही केलं. तिच्याकडून त्याला तीन मुलं आहेत. या काळात त्याने अनेक ठिकाणी कामही केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे अनेक वर्षे संदीपला शोधणं अधिकाधिक कठीण होऊन बसलं. खून झाला, त्यावेळी त्याला अजिबात दाढी नव्हती, क्लिन शेव्ह केली होती. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेले फोटोच तपासासाठी व्हायरल करण्यात आले. पण फारसा तपास लागला नाही.
नंतर पोलिसांनी संदीपच्या इतर शारिरीक वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेण्यासाठी त्याच्या परिवाराची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांना कळलं की जखमेचा एक डाग लपवण्यासाठी संदीपने आपल्या डाव्या हातावर स्वस्तिक आकाराचा टॅटू काढला आहे. तर उजव्या हाताचं एक बोट तुटलेलं आहे. त्यानंतर पोलिसांनी संदीपला शोधायला सुरुवात केली.
२०१५मध्ये संदीप दिल्लीला आला होता. तिथे तो काम करत होता. त्यानंतर पुन्हा बिहारला निघून गेला. बरीच वर्षे तो बिहार झारखंड दोन्ही राज्यांमध्ये विविध ठिकाणी फिरत होता. त्यानंतर गेल्या वर्षी तो आपल्या परिवारासह दिल्लीत परतला आणि विकासनगर इथं राहू लागला.
संदीप जिथे जिथे काम करत होता, तिथल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर एका मालकाने त्याला ओळखलं आणि त्याचा पत्ता सांगितला. तेव्हा त्या पत्त्यावर पोहोचून पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांना कळलं की संदीपने आपल्या हातावरचा टॅटू काढण्याचा खूप प्रयत्नही केला. मात्र तो कायमस्वरुपी असल्याने निघाला नाही, आणि अखेर संदीप पोलिसांच्या हाती आला.